

वॉशिंग्टन : अमेरिकेत वाढत चाललेल्या भीषण वणव्यांमागे एक साधं, सर्वत्र आढळणारं आणि निरुपद्रवी वाटणारं गवत मोठं कारण ठरत आहे. योग्य हवामानात हेच गवत पेट्रोलसारखं काम करतं आणि एका छोट्या ठिणगीने प्रचंड वेगाने आग पसरते.
हवामान बदलामुळे तापमान आणि पर्जन्यमानात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे कोरडेपणा वाढतो, गवत दाट वाढतं आणि ते लवकर सुकून ज्वलनशील बनतं. परिणामी, वणवे अधिक मोठे, वेगवान आणि विनाशकारी होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, गवताच्या आगी जंगलातील आगींपेक्षा कमी तीव्र असल्या तरी त्या खूप जलद पसरतात आणि अग्निशमन यंत्रणेलाही चकवा देतात. गेल्या तीन दशकांत वणव्यांमुळे नष्ट झालेल्या घरांची संख्या दुप्पट झाली आहे. यातील बहुतेक घरे जंगलातील नव्हे, तर गवत आणि झुडपांच्या आगीत जळाली आहेत. विशेषतः अमेरिकेच्या पश्चिम भागात ही समस्या गंभीर आहे, जिथे सुमारे दोन-तृतीयांश नुकसान नोंदवले गेले आहे.
यामागे आणखी एक कारण म्हणजे लोकांची वस्ती जंगलालगत वाढणे. “वाइल्डलँड-अर्बन इंटरफेस” म्हणून ओळखल्या जाणार्या या भागात आता लाखो घरे उभी आहेत. त्यामुळे आग लागण्याचा धोका आणि त्याचा परिणाम दोन्ही वाढले आहेत. गवताची खासियत म्हणजे ते हवामानाला अतिशय संवेदनशील असते. थोड्याच वेळात ते कोरडे होऊन ज्वलनशील बनते. पाऊस झाल्यानंतरही काही तासांत ते पुन्हा पेट घेण्यास तयार होते. त्यात जोरदार वारे आणि उष्ण तापमान मिळाल्यास “परफेक्ट स्टॉर्म” तयार होतो. विशेष म्हणजे, आगीमुळे नष्ट झालेल्या भागात गवत खूप वेगाने पुन्हा उगवतं, ज्यामुळे भविष्यातील आगींचा धोका आणखी वाढतो. अशा दुष्टचक्रामुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात येत असून, भविष्यात वणव्यांची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.