

बीजिंग : ज्या वाळवंटातील तापत्या वाळूवर 5 मिनिटे उभे राहणे कठीण असते, तिथे अवघ्या एका वर्षात शेती होऊ शकते, यावर तुमचा विश्वास बसेल का? हे ऐकायला जरी अजब वाटत असले, तरी चीनच्या शास्त्रज्ञांनी हा चमत्कार करून दाखवला आहे. निसर्गातील एक गुपित असलेल्या ‘सायनोबॅक्टेरिया’चा वापर करून शास्त्रज्ञांनी असा फॉर्म्युला तयार केला आहे, जो वाळूच्या कणांना डिंकासारखे एकत्र जोडून ठेवतो.
चीनच्या ‘शापोटौ डेझर्ट एक्सपेरिमेंटल रिसर्च स्टेशन’च्या संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी केवळ 10 महिन्यांत ओसाड आणि उडणार्या वाळूला सुपीक मातीत बदलण्याचे तंत्र शोधले आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा कणा आहेत ‘सायनोबॅक्टेरिया’ नावाचे सूक्ष्म जीव. जैविक थर (Biological Soil Crust) : हे विशेष जीव प्रकाशसंश्लेषणाद्वारे (Photosynthesis) ऊर्जा तयार करतात. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत हे बॅक्टेरिया तयार करून वाळवंटातील वाळूवर पसरवले.
डिंकासारखा पदार्थ : हे बॅक्टेरिया वाळूवर गेल्यावर एक प्रकारचा चिपचिपा (चिकट) पदार्थ सोडतात. हा पदार्थ वाळूच्या कणांना घट्ट पकडून ठेवतो, ज्यामुळे वाळू उडणे बंद होते आणि ती एका स्थिर जमिनीच्या स्वरुपात तयार होते. निसर्गात माती तयार होण्याच्या प्रक्रियेला शेकडो वर्षे लागतात. मात्र, या तंत्रज्ञानाने हा काळ एका वर्षापेक्षाही कमी केला आहे. संशोधनानुसार, हा कृत्रिम थर नैसर्गिक प्रक्रियेच्या तुलनेत : कार्बन सिंक : 3.2 पटीने वेगाने करतो. नायट्रोजन पातळी : 15 पटीने वेगाने वाढवतो. पोषक तत्त्वे : नायट्रोजन आणि फॉस्फरसमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे ही जमीन गवत, झुडपे आणि पिके घेण्यासाठी अत्यंत योग्य बनली आहे.
वाळवंटात झाडे लावणे हे अत्यंत कष्टाचे आणि खर्चिक काम असते. तसेच तिथले वातावरण झाडांना जगू देत नाही. त्या तुलनेत ‘सायनोबॅक्टेरिया’ तंत्रज्ञान अत्यंत स्वस्त आहे. हे बॅक्टेरिया कडक उन्हात आणि दुष्काळातही जिवंत राहू शकतात आणि पावसाचे पाणी मिळताच वेगाने पसरू लागतात. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात ‘ड्रोन’ आणि ‘ऑटोमेशन’च्या मदतीने जगातील मोठ्या कोरड्या प्रदेशांत या तंत्राचा वापर करता येईल. यामुळे केवळ वाळवंटीकरणच थांबणार नाही, तर ग्लोबल वॉर्मिंग आणि अन्न संकटाचा सामना करण्यासाठीही हे तंत्रज्ञान जगाला मोठी मदत करेल.