

सिलिकॉन व्हॅली : गूगलने गुरुवारी आपल्या एआय तंत्रज्ञानातील प्रगतीचा पुढचा टप्पा गाठत नवीन आणि वेगवान एआय मॉडेल ‘जेमिनी 3 फ्लॅश’ लाँच केले आहे. गेल्या महिन्यात सादर झालेल्या ‘जेमिनी 3’वर आधारित हे मॉडेल विशेषतः वेग, किफायतशीर दर आणि मोठ्या प्रमाणावरील कामांसाठी विकसित करण्यात आले आहे. कंपनीने या मॉडेलचे वर्णन ‘वर्कहॉर्स मॉडेल’ असे केले आहे.
गूगल आता जेमिनी अॅपमध्ये आणि गूगल सर्चच्या एआय मोडमध्ये ‘जेमिनी 3 फ्लॅश’ ला ‘डिफॉल्ट मॉडेल’ म्हणून सेट करत आहे. मात्र, यूजर्सना गणित किंवा कोडिंगसारख्या कठीण कामांसाठी मॅन्युअली ‘जेमिनी 3 प्रो’ निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. ‘जेमिनी 3 फ्लॅश’ने अनेक महत्त्वाच्या चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गूगलच्या दाव्यानुसार, जेमिनी 3 फ्लॅश व्हिडीओ, फोटो आणि ऑडिओ अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो.
जर एखाद्या यूजरने ‘पिकलबॉल’चा व्हिडीओ अपलोड करून त्याबद्दल विचारले, तर हे मॉडेल व्हिडीओ पाहून अचूक उत्तर देऊ शकते. यूजरने काढलेले स्केच ओळखून त्यावर भाष्य करणे किंवा ऑडिओ क्लिपचे विश्लेषण करून त्यावर आधारित क्विझ तयार करण्याची क्षमता यात आहे. हे मॉडेल ‘व्हर्टेक्स एआय’ आणि ‘जेमिनी एंटरप्राईझ’वर उपलब्ध आहे. ‘फिग्मा’ आणि ‘कर्सर’ सारख्या कंपन्या आधीच याचा वापर करत आहेत. कोडिंगसाठी ‘जेमिनी 3 प्रो’ ने ‘एसडब्ल्यूई बेंच’ चाचणीत 78 टक्के गुण मिळवले आहेत, ज्याला केवळ GPT-5.2 ने मागे टाकले आहे.