

सॅन फ्रान्सिस्को : सध्याच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या जगात, एखादी प्रतिमा एआयद्वारे तयार केली आहे की, संपादित केली आहे, हे ओळखणे खूप कठीण झाले आहे. डिजिटल सामग्रीच्या मूळ स्रोताबाबत वाढत्या चिंता दूर करण्यासाठी, ‘गुगल’ ने आता जेमिनी अॅपमध्ये एक नवीन फीचर सादर केले आहे, जे वापरकर्त्यांना कोणतीही प्रतिमा ‘गुगल’च्या एआय टूलचा वापर करून तयार किंवा संपादित केली आहे की नाही, हे त्वरित तपासण्याची सुविधा देते.
कंपनीने आपले नवीन जेमिनी 3-पॉवर्ड नॅनो बनाना प्रो मॉडेल सादर करतानाच हे नवीन फीचर जारी केले आहे, ज्यामुळे एआय-जनरेटेड सामग्रीच्या पारदर्शकतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. या फीचरच्या प्रारंभिक टप्प्यात, केवळ प्रतिमांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि यासाठी ‘गुगल’च्या SynthID या अद़ृश्य एआय वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लवकरच व्हिडीओ आणि ऑडिओच्या तपासणीची सुविधा जोडली जाईल, असे ‘गुगल’ ने स्पष्ट केले आहे.
हे फीचर जेमिनी अॅपव्यतिरिक्त ‘गुगल’ सर्च सारख्या प्लॅटफॉर्मवर देखील विस्तारले जाईल. भविष्यात, डिजिटल सामग्रीची पडताळणी करण्यासाठी एक उद्योग-व्यापी मानक असलेल्या C2 PA कंटेंट क्रेडेंशियल्सचे सपोर्ट देखील जोडले जाणार आहे. ‘गुगल’ ची नवीन ओळख प्रणाली SynthID नावाच्या अद़ृश्य डिजिटल वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाद्वारे कार्य करते : जेव्हा ‘गुगल’चे एआय कोणतीही प्रतिमा तयार करते, तेव्हा SynthID त्या प्रतिमेमध्ये शांतपणे छुपे मार्कर जोडते. हे मार्कर प्रतिमेच्या स्वरूपात कोणताही बदल करत नाहीत आणि वापरकर्त्याला ते अजिबात दिसत नाहीत.
मात्र, ‘गुगल’चे जेमिनी अॅप हे मार्कर वाचू शकते आणि ती प्रतिमा ‘गुगल’च्या ‘एआय’चा वापर करून बनवली किंवा संपादित केली आहे की नाही, हे निश्चित करू शकते. जेमिनी केवळ ‘गुगल’ च्या स्वतःच्या साधनांनी तयार केलेल्या किंवा सुधारित केलेल्या प्रतिमांचीच पडताळणी करू शकते. जर एखादी प्रतिमा दुसर्या कंपनीच्या एआय मॉडेलमधून किंवा स्वतंत्र विकासकाकडून आली असेल, तर जेमिनी तिचा स्रोत निश्चित करू शकणार नाही. तरीही, हे फीचर मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन सामग्रीसाठी उपयुक्त ठरणार आहे.