

वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) जगात ‘गूगल’च्या डीपमाईंडने एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. कंपनीने आपला नवा ‘जिनी 3’ (Genie 3) मॉडेल सादर केले आहे, जो वापरकर्त्यांना केवळ काही शब्दांच्या मदतीने संपूर्ण 3-डी व्हर्च्युअल जग (3-D Virtual World) तयार करण्याची सुविधा देतो. हे तंत्रज्ञान इतके प्रगत आहे की, आता कोणीही आपल्या कल्पनेतील जग सहज साकारू शकणार आहे.
‘जिनी 3’ हा मागील ‘जिनी 2’ मॉडेलची सुधारित आवृत्ती असून, तो अधिक परस्परसंवादी ((Interactive) आणि उत्तम कामगिरी करणारा आहे. या मॉडेलमुळे 3-डी व्हर्च्युअल जग बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. ‘जिनी 3’ मॉडेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, वापरकर्त्याने दिलेल्या काही शब्दांवरून (Text Prompt) संपूर्ण 3-डी जग स्वयंचलितपणे तयार होते. हे जग तयार करण्यासाठी पूर्वनिर्मित घटकांचा वापर केला जात नाही, तर ‘एआय’ स्वतः प्रत्येक गोष्ट नव्याने तयार करते. जेव्हा वापरकर्ता कॅमेरा फिरवतो, तेव्हा कोणती वस्तू कुठे होती हे ‘एआय’ लक्षात ठेवते, ज्यामुळे एक सहज आणि वास्तववादी अनुभव मिळतो.
या नव्या मॉडेलमध्ये 720 p रेझोल्युशनवर व्हर्च्युअल जग पाहता येते आणि पूर्वीच्या तुलनेत जास्त वेळ चालणार्या संवादांनाही तो हाताळू शकतो. ‘जिनी 3’ मध्ये अनेक नवीन आणि प्रभावी वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, ज्यामुळे वापरकर्त्याचा अनुभव अधिक समृद्ध होतो. प्रॉम्प्टेबल वर्ल्ड इव्हेंटस् : या खास सुविधेमुळे वापरकर्ते केवळ कमांड देऊन जगात बदल घडवू शकतात. उदाहरणार्थ, हवामान बदलणे, नवीन पात्रे जोडणे किंवा जगातील घटना नियंत्रित करणे शक्य झाले आहे. सुधारित मेमरी : हा मॉडेल आता सुमारे 1 मिनिटांपर्यंतची व्हिज्युअल माहिती लक्षात ठेवू शकतो, जी त्याच्या पूर्वीच्या मॉडेलपेक्षा खूपच जास्त आहे.
गूगलच्या मते, ‘जिनी 3’ मॉडेल केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहणार नाही. शिक्षण, रोबोटिक्सला प्रशिक्षण देणे आणि इंटरॅक्टिव्ह गेमिंग यांसारख्या क्षेत्रात तो अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात शिकण्याच्या आणि नवनिर्मितीच्या पद्धतीत मोठे बदल अपेक्षित आहेत. गूगलने ‘जिनी 3’ मॉडेल सध्या सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केलेला नाही. संभाव्य धोके ओळखण्यासाठी आणि ते कमी करण्यासाठी सध्या तो केवळ निवडक संशोधकांसाठी ‘प्रिव्ह्यू’ स्वरूपात जारी करण्यात आला आहे. या मॉडेलला काही मर्यादादेखील आहेत; उदाहरणार्थ, जर इनपूटमधील शब्द अतिशय स्पष्ट नसतील, तर जगातील तपशील योग्यरीत्या दिसत नाही.