

नवी दिल्ली : भावनिक बुद्धिमत्ता केवळ व्यावसायिक किंवा वैयक्तिक नात्यांपुरती मर्यादित नसून, मुलांसोबतच्या रोजच्या संवादातही ती अत्यंत महत्त्वाची ठरते. कौटुंबिक संबंधांवर काम करणार्या तज्ज्ञांच्या मते, जे पालक स्वतःच्या भावनांबद्दल जागरूक असतात, ते आपल्या मुलांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आणि त्यांच्या विकासासाठी एक स्थिर आणि सुरक्षित वातावरण तयार करतात. असे पालक परिपूर्ण नसतात; पण त्यांची वागणूक मुलांवर कायमस्वरूपी प्रभाव टाकते, याची त्यांना जाणीव असते. भावनिकद़ृष्ट्या बुद्धिमान पालकांमध्ये काही समान वैशिष्ट्ये आढळतात.
भावनिकद़ृष्ट्या बुद्धिमान पालक रागाच्या भरात मुलांवर ओरडत नाहीत. राग आल्यास ते दीर्घ श्वास घेतात, काही क्षणांसाठी बाजूला होतात किंवा मुलांशी बोलण्यापूर्वी त्यांच्या शांत होण्याची वाट पाहतात. यामुळे भावना व्यक्त करणे योग्य आहे; पण त्यावर अविचारीपणे प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, हा संदेश मुलांपर्यंत पोहोचतो.
आईस्क्रीम खाली पडल्यामुळे रडणार्या मुलाला ‘यात काय एवढं’ असे म्हणून गप्प करत नाहीत. भावनिकद़ृष्ट्या बुद्धिमान पालक स्वतःला मुलाच्या जागी ठेवून विचार करतात आणि त्याच्या भावना स्वीकारतात, जरी त्या त्यांना क्षुल्लक वाटत असल्या तरी. अशा सहानुभूतीतूनच मुलांमध्ये भावनिक सुरक्षितता निर्माण होते.
हे पालक स्वतःला कधीही न चुकणारे समजत नाहीत. त्यांच्याकडून अतिप्रतिक्रिया झाल्यास किंवा चुकीचा निर्णय घेतल्यास ते मोकळेपणाने माफी मागतात. उदाहरणार्थ, माफ कर, मी तुझ्यावर ओरडलो. मी थकलो होतो; पण तसे वागायला नको होते, असे बोलल्याने मोठ्या व्यक्तीही आपल्या वागणुकीसाठी जबाबदार असतात, हे मुलांना शिकायला मिळते.
भावनिकद़ृष्ट्या उपलब्ध असण्याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला होकार देणे नव्हे. असे पालक नियम आणि त्याचे परिणाम स्पष्टपणे सांगतात; पण ते भीती किंवा अपमान न करता. आदराने आणि शांत स्वरातही सीमा ठरवता येतात, हे मुलांना कळते.
दुःख, लाज किंवा राग यांसारख्या नकारात्मक भावना दाबण्याऐवजी, भावनिकद़ृष्ट्या बुद्धिमान पालक मुलांना त्या अनुभवू देतात. ते मुलांचा मूड सतत ‘ठीक’ करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्या भावनांमधून जाताना त्यांच्यासोबत उभे राहतात. यामुळे मुलांमध्ये भावनांची सखोल समज आणि स्थिरता निर्माण होते.