

जकार्ता : सोने खाणकाम हा शतकानुशतके एक महत्त्वाचा उद्योग राहिला आहे. जगातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे असून, ते त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान देतात. अशाच प्रमुख सुवर्ण खाणींपैकी एक ग्रासबर्ग खाण इंडोनेशियाच्या पापुआ भागात स्थित आहे. ही खाण इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असून, ती जगातील सर्वात श्रीमंत सुवर्ण खाण मानली जाते. दरवर्षी या खाणीतून सुमारे 48 टन सोने काढले जाते. विशेष म्हणजे, ही खाण सोने उत्पादनाबरोबरच तांबे उत्पादनातही जगातील आघाडीच्या खाणींपैकी एक आहे.
या खाणीतून मिळणार्या खनिज अयस्कात सोन्याचे आणि तांब्याचे प्रमाण खूप जास्त आहे. ही खाण पापुआतील सर्वात उंच पुंचक जया पर्वताजवळ आहे. हा संपूर्ण प्रदेश टेक्टोनिक प्लेटस्च्या हालचालींमुळे तयार झाला असल्याने येथे भरपूर खनिज संपत्ती आढळते. ही खाण मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे आणि सध्या सुमारे 20,000 कर्मचारी येथे कार्यरत आहेत. या खाणीजवळ एक खास विमानतळ आणि बंदरही आहे. याशिवाय कर्मचार्यांसाठी निवासी वसाहती, शाळा आणि रुग्णालयांचीही सुविधा आहे. पूर्वी येथे एक मैल रुंदीचा विशाल ओपन-पिट (खुला खड्डा) होता; मात्र आता तेथील साठे आटल्याने अंडरग्राऊंड खाणकाम सुरू आहे. 2023 मध्ये ग्रासबर्ग खाणीतून 52.9 टन सोने (1.7 दशलक्ष औंस), 6,80,000 टन तांबे आणि 190 टन चांदी या खनिजांचे उत्पादन झाले, ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठ्या खाणींपैकी एक ठरली. अंदाजानुसार या खाणीत 40 अब्ज डॉलर मूल्याएवढे सोने अजूनही उपलब्ध आहे. याचा अर्थ, येत्या अनेक दशकांपर्यंत ही खाण सोन्याची एक प्रमुख उत्पादक राहणार आहे.