

न्यूयॉर्क : जगभरात इलेक्ट्रॉनिक कचर्याचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असताना, शास्त्रज्ञांनी या समस्येतून एक सुवर्णसंधी शोधून काढली आहे. जुने लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून अत्यंत सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सोने काढण्याचे एक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान केवळ ई-कचर्याच्या समस्येवर तोडगा काढणार नाही, तर सोन्याच्या खाणकामातील विषारी रसायनांचा वापर टाळण्यासही मदत करेल.
एका अहवालानुसार, 2022 मध्ये जगभरात तब्बल 6.2 कोटी टन ई-कचरा निर्माण झाला. हा आकडा इतका प्रचंड आहे की, त्याने 15 लाखांपेक्षा जास्त ट्रक पूर्ण भरले जाऊ शकतात. 2010 पासून यात 82 टक्के वाढ झाली असून, 2030 पर्यंत हा आकडा 8.2 कोटी टनांपर्यंत पोहोचण्याचा धक्कादायक अंदाज आहे. या कचर्यात सोन्यासारखे अनेक मौल्यवान धातू असतात; परंतु दुर्दैवाने यातील केवळ एक चतुर्थांश कचर्यावरच योग्य प्रक्रिया आणि पुनर्वापर होतो. सध्या सोन्याच्या खाणकामात मोठ्या प्रमाणावर विषारी सायनाईडचा वापर होतो, तर लहानस्तरावरील खाणकामात पारा वापरला जातो. ही दोन्ही रसायने मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहेत. याच गंभीर समस्येवर उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.
शास्त्रज्ञांच्या पथकाने या सोप्या पद्धतीचा वापर जुन्या कॉम्प्युटरच्या सर्किट बोर्डमधून आणि खाणकामातील कच्च्या धातूमधून यशस्वीरीत्या सोने काढून दाखवले आहे. हे नवीन तंत्रज्ञान सोन्याच्या पुनर्वापरात आणि खाणकामात क्रांती घडवून आणण्याची क्षमता ठेवते, ज्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी मोठ्या प्रमाणात टाळता येईल.
‘नेचर सस्टेनेबिलिटी’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली आहे. या पद्धतीत शास्त्रज्ञांनी एका सामान्य रसायनाचा वापर केला आहे, जे पाणी शुद्ध करण्यासाठी आणि जलतरण तलावांमध्ये वापरले जाते. ‘ट्रायक्लोरोआयसोसायन्यूरिक अॅसिड’ (Trichloroisocyanuric acid) नावाचे हे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे रसायन खार्या पाण्यात मिसळल्यावर ते सोन्यासोबत प्रक्रिया करून त्याला पाण्यात विरघळवते. या द्रावणातून सोने वेगळे काढण्यासाठी सल्फर (गंधक) युक्त एक विशेष ‘पॉलिमर सॉर्बेंट’ विकसित करण्यात आले आहे. हा पॉलिमर द्रावणातील इतर धातूंना सोडून फक्त सोन्यालाच अचूकपणे पकडतो आणि वेगळे करतो. या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात वापरले जाणारे रसायन आणि पॉलिमर या दोन्हींचा पुनर्वापर करणे शक्य आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक टिकाऊ आणि किफायतशीर ठरते.