

मुंबई : आजच्या डिजिटल युगात सरकारी कामांपासून ते ऑफिसच्या प्रोजेक्टस्पर्यंत सर्व काही ई-मेलवर अवलंबून आहे. बँकेचे पेमेंट असो किंवा ऑफिसच्या मीटिंगची डेडलाईन, महत्त्वाचे मेसेज आपल्या जी मेलवर सतत येत असतात. अनेकदा आपण हे ई-मेल वाचतो, पण कामाच्या व्यापात नेमक्या वेळी ते करायला विसरतो. या समस्येवर उपाय म्हणून गुगलने दिलेले स्नूझ फीचर अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
ज्याप्रमाणे आपण सकाळी उठण्यासाठी अलार्म स्नूझ करतो, त्याचप्रमाणे जी-मेलमधील हे फीचर काम करते. एखादा महत्त्वाचा ई-मेल वाचल्यानंतर तो सध्या इनबॉक्समध्ये नको असेल, पण भविष्यात ठराविक वेळी त्याची पुन्हा आठवण हवी असेल, तर तुम्ही तो स्नूझ करू शकता. एकदा ई-मेल स्नूझ केला की, तो तात्पुरता इनबॉक्समधून गायब होतो आणि तुम्ही सेट केलेल्या वेळेवर पुन्हा नवीन ई-मेल म्हणून सर्वात वर येऊन धडकतो.
हे फीचर अशा लोकांसाठी उत्तम आहे जे ई-मेल वाचतात, पण नंतर विसरून जातात. उदाहरणार्थ, जर तुमच्या वीज बिल भरण्याची 5 तारीख असेल, तर तुम्ही तो ई-मेल 5 तारखेच्या सकाळपर्यंत स्नूझ करू शकता. यामुळे योग्य वेळी तुम्हाला रिमाईंडर मिळेल. तुमचे महत्त्वाचे काम आता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला पुन्हा आठवण करून दिले जाईल. तंत्रज्ञानाचा हा छोटासा वापर तुमचा विसरभोळेपणा दूर करून कामात शिस्त आणू शकतो.
असा करा वापर :
1. तुमच्या जी-मेल इनबॉक्समध्ये जा आणि ज्या ई-मेलला स्नूझ करायचे आहे त्यावर कर्सर न्या.
2. उजव्या बाजूला तुम्हाला काही चिन्हे दिसतील, त्यातील घड्याळाच्या आयकॉनवर क्लिक करा.
3. क्लिक केल्यावर तुम्हाला काही पर्याय मिळतील (उदा. उद्या, पुढील आठवड्यात).
4. तुम्हाला स्वतःची वेळ निवडायची असेल, तर पिक डेट अँड टाईमवर क्लिक करून तारीख आणि वेळ निश्चित करा.