

वॉशिंग्टन : येत्या काही वर्षांत जगभरात श्रीमंती आणि संपत्तीच्या बाबतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हे बदल कदाचित लोकांना माहीत असलेल्या सर्वसामान्य आर्थिक पद्धतींपेक्षा पूर्णपणे वेगळे असू शकतात. येत्या काळात जगभरातील अब्जाधीशांच्या संख्येत कमालीची वाढ होऊ शकते. आशिया, युरोप आणि मध्य पूर्व देशांमधील वेगवेगळ्या कारणांमुळे ही वाढ पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘नाईट फ्रँक वेल्थ रिपोर्ट २०२६’ नुसार, २०२६ ते २०३१ दरम्यान जगभरातील अब्जाधीशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा अंदाज आहे.
संपूर्ण जगाचा विचार केला, तर अब्जाधीशांची संख्या २०२१ मध्ये २,७२३ इतकी होती, जी २०२६ मध्ये वाढून ३,११० झाली आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत यात १४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मात्र, आता येत्या वर्षांत हा वेग अधिक तीव्र होणार आहे. ‘नाईट फ्रँक’च्या अहवालानुसार, पुढील पाच वर्षांत जगभरातील अब्जाधीशांच्या संख्येत २६ टक्क्यांची वाढ होईल आणि २०३१ पर्यंत हा आकडा ३,९१५ वर पोहोचेल. या संभाव्य वाढीमध्ये युरोप खंडाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. युरोपमधील अब्जाधीशांची संख्या २०२६ मधील ७८० वरून २०३१ पर्यंत ९९४ वर पोहोचण्याचा अंदाज आहे, जी २७ टक्क्यांची वाढ दर्शवते.
अब्जाधीशांच्या संख्येतील टक्केवारीच्या वाढीचा विचार केला, तर सौदी अरेबिया जगात पहिल्या क्रमांकावर राहू शकतो. सौदी अरेबियामध्ये अब्जाधीशांच्या संख्येत तब्बल १८३ टक्क्यांची प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तिथे २०२६ मधील २३ अब्जाधीशांचा आकडा २०३१ पर्यंत ६५ वर पोहोचेल. सौदी अरेबियातील या वेगवान आर्थिक प्रगतीचा थेट संबंध तिथल्या ‘व्हिजन २०३०’ या महत्त्वाकांक्षी योजनेशी आहे. या योजनेद्वारे सौदी अरेबियाला आपली अर्थव्यवस्था केवळ तेलावर अवलंबून न ठेवता इतर विविध क्षेत्रांमध्ये विस्तारायची आहे. सर्वात वेगाने अब्जाधीशांची संख्या वाढणाऱ्या देशांच्या जागतिक यादीत भारत १० व्या स्थानावर आहे. अहवालानुसार, पुढील पाच वर्षांत भारतातील अब्जाधीशांची संख्या ५१ टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जे भारताच्या मजबूत आर्थिक प्रगतीचे संकेत देत आहे.