

पॅरिस : प्लास्टिकच्या बाटलीतील पेये आरोग्यासाठी धोकादायक असतात आणि त्याऐवजी काचेच्या बाटल्या वापरणे अधिक सुरक्षित आहे, हा आपला आतापर्यंतचा समज एका नवीन अभ्यासाने खोटा ठरवला आहे. फ्रान्समध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, प्लास्टिकच्या तुलनेत काचेच्या बाटल्यांमध्ये अधिक प्रमाणात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत, ज्यामुळे आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
फ्रान्सची अन्न सुरक्षा एजन्सी ‘अछडएड’ ने केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ फूड कंपोझिशन अँड अॅनालिसिस’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. संशोधकांना सुरुवातीला अपेक्षा होती की काचेच्या बाटल्या अधिक सुरक्षित ठरतील; परंतु निकाल पाहून तेही चक्रावून गेले. ‘आम्हाला पूर्णपणे उलट निकालांची अपेक्षा होती,’ असे या संशोधनाचे नेतृत्व करणार्या इसेलिन चॅब यांनी म्हटले आहे.
अभ्यासानुसार, कोल्ड्रिंक्स, लिंबूपाणी, आइस्ड टी आणि बीअर यांसारख्या पेयांच्या काचेच्या बाटल्यांमध्ये प्रति लिटर सुमारे 100 मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले. हे प्रमाण प्लास्टिक किंवा धातूच्या कंटेनरपेक्षा तब्बल 50 पट जास्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सर्व बाटल्यांमध्ये बीअरच्या बाटल्यांमध्ये मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक होते, ज्यात सरासरी 60 कण प्रतिलिटर होते. त्याखालोखाल लिंबूपाण्यात सुमारे 40 टक्के कण आढळले. याउलट, साध्या आणि स्पार्कलिंग पाण्याच्या बाटल्यांमध्ये मायक्रोप्लास्टिकची पातळी तुलनेने खूप कमी दिसून आली. पाण्याच्या काचेच्या बाटल्यांमध्ये प्रतिलिटर सुमारे 4.5 कण, तर प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये केवळ 1.6 कण आढळले.
या निकालांवरून स्पष्ट होते की, वाईन वगळता इतर सर्व पेयांसाठी काचेची पॅकेजिंग अधिक दूषित आहे. संशोधकांच्या मते, या मायक्रोप्लास्टिकचा मुख्य स्रोत बाटलीचे झाकण असू शकते. कारण पेयांमधून वेगळे केलेले बहुतेक कण हे झाकणाच्या रंगाशी जुळणारे होते. ‘काचेच्या कंटेनरमधील नमुन्यांतील कण समान आकार, रंग आणि संरचनेचे असल्याचे आम्ही पाहिले,’ असे चॅब यांनी स्पष्ट केले. या विरोधाभासाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अछडएड चे संशोधन संचालक गिलौम डुफ्लोस यांनी सांगितले. मात्र, एजन्सीने या समस्येवर एक संभाव्य उपाय शोधून काढला आहे. अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की, बाटलीचे झाकण वापरण्यापूर्वी ते काढून पाणी आणि इथेनॉलच्या मिश्रणाने स्वच्छ धुतल्यास मायक्रोप्लास्टिकची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.