

न्यूयॉर्क : अलास्कामध्ये केवळ चार दशकांत एक नवीन बेट तयार झाले असल्याचा धक्कादायक खुलासा नासाने उपग्रहांच्या प्रतिमांच्या आधारे केला आहे. हे बेट, ज्याला ‘प्रो नॉब’ असे नाव दिले आहे, ते एकेकाळी ‘अल्सेक हिमनदी’ (अल्सेक ग्लेसियर) च्या खोल बर्फाने वेढलेले एक लहान पर्वत होते. परंतु, आता ते पूर्णपणे पाण्याने वेढले गेले आहे.
भूगर्भीय प्रक्रियेनुसार, एखादे बेट तयार होण्यासाठी शेकडो किंवा हजारो वर्षे लागतात. मात्र, अलास्कामध्ये हा बदल केवळ 40 वर्षांमध्ये झाला आहे. 1984 मध्ये घेतलेल्या उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये ‘प्रो नॉब’ पर्वत हिमनदीच्या बर्फाशी जोडलेला दिसत होता. पण, नासाच्या लँडसॅट 8 उपग्रहाने ऑगस्ट 2025 मध्ये घेतलेल्या ताज्या चित्रांमध्ये हा पर्वत पूर्णपणे पाण्याने वेढलेला असून, त्याचे एका स्वतंत्र बेटावर रूपांतर झाल्याचे दिसून आले. जुलै ते ऑगस्ट 2025 दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचा अंदाज आहे.
नासाच्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीने स्पष्ट केले आहे की, मानवामुळे झालेल्या हवामान बदलामुळे (क्लायमेट चेंज) ग्रहावरील तापमान वेगाने वाढत आहे, ज्यामुळे हिमनद्या वितळत आहेत. यामुळेच अल्सेक हिमनदी मागे सरकली आणि तिच्या वितळलेल्या पाण्याने अल्सेक तलावाचा आकार वाढवला. 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला, अल्सेक हिमनदी आजच्या तलावाला पूर्णपणे व्यापून होती. 1960 च्या दशकातील हवाई छायाचित्रे देखील दर्शवतात की ‘प्रो नॉब’ हा बर्फाने वेढलेला होता. मात्र, जसजसे जागतिक तापमान वाढले, तसतसे हिमनदीची रचना कमकुवत होत गेली. यामुळे हिमनदीचे मोठमोठे तुकडे तुटून पडू लागले आणि त्यामुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान झाली.
अलास्कामध्ये अशा प्रकारे हिमनद्या वितळून अनेक नवे तलाव तयार होत आहेत, ज्यामुळे या भागाला ‘नवीन तलावांचा भाग’ म्हटले जात आहे. हे वाढलेले तलाव धोकादायक ठरू शकतात. कारण, ती अनेकदा नैसर्गिक दगडांच्या किंवा बर्फाच्या भिंतींनी अडवलेली असतात. जर या भिंती कोसळल्या, तर अचानक पूर येऊन मोठी हानी होण्याची शक्यता आहे. या शोधाने हे स्पष्ट झाले आहे की, हवामान बदलाचे परिणाम केवळ दूरवरच्या भागातच नाहीत, तर ते जमिनीच्या भूगोलातही मोठे बदल घडवून आणत आहेत.