Giza Pyramid Discovery | गिझाच्या पिरॅमिडजवळ सापडली रहस्यमयी ‘L’ आकाराची रचना

Giza Pyramid Discovery |
Giza Pyramid Discovery | गिझाच्या पिरॅमिडजवळ सापडली रहस्यमयी ‘L’ आकाराची रचना
Published on
Updated on

कैरो : इजिप्तमधील जगप्रसिद्ध गिझाचे पिरॅमिड गेल्या कित्येक पिढ्यांपासून जगभरातील संशोधकांसाठी आकर्षणाचे आणि अभ्यासाचे केंद्र राहिले आहे. आता एका नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधकांनी जमिनीला किंवा वर असलेल्या नाजूक अवशेषांना कोणताही धक्का न लावता, वाळूच्या खाली डोकावण्यात यश मिळवले आहे. 'द आर्कियोलॉजिस्ट'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, जपानी आणि इजिप्शियन संशोधकांच्या संयुक्त चमूने दोन आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पिरॅमिडजवळ जमिनीखाली इंग्रजी ‘एल’ आकाराच्या एका असामान्य रचनेचा शोध लावला आहे.

गेल्या काही दशकांमध्ये पुरातत्त्व शास्त्रात मोठे बदल झाले आहेत. आता संशोधक केवळ खोदकामावर अवलंबून न राहता, जमिनीखालील अचूक नकाशे तयार करणाऱ्या उपकरणांचा वापर करत आहेत. ग्राउंड-पेनेट्रेटिंग रडार (GPR) या तंत्रज्ञानात जमिनीखाली इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी (विद्युत चुंबकीय लहरी) पाठवल्या जातात. वाळू किंवा मातीच्या थराखाली असलेल्या वस्तू किंवा भिंतींवरून या लहरी परावर्तित होतात. यामुळे वाळूचा एक कणही न हलवता जमिनीखालील भिंती, तळघरे किंवा वास्तूंचे अचूक नकाशे तयार करता येतात.

या तंत्रज्ञानाचा वापर करून यापूर्वी स्कॅन्डिनेव्हियामध्ये गाडलेली वायकिंग जहाजे, दक्षिण अमेरिकेतील घनदाट जंगलांखालील प्राचीन वस्त्या आणि रोमन शहरांचे नकाशे शोधण्यात यश आले आहे. हे नवीन सर्वेक्षण गिझा पिरॅमिड परिसराजवळील 'वेस्टर्न सिमेट्री' (पश्चिमी कब्रस्तान) भागात करण्यात आले. या भागात इजिप्तमधील प्राचीन काळातील उच्चभ्रू आणि अधिकाऱ्यांच्या कबरी आहेत. संशोधकांनी येथे 'ग्राउंड-पेनेट्रेटिंग रडार' आणि 'इलेक्ट्रिकल रेजिस्टिविटी टोमोग्राफी' (ERT) या दोन्ही तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर केला. ERT मुळे नैसर्गिक खडक आणि मानवनिर्मित रचनांमधील फरक ओळखणे सोपे जाते.

या दोन्ही उपकरणांच्या डेटावरून वाळवंटाच्या खाली एक ‘L’ आकाराची रचना असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर या रचनेच्या अगदी जवळ आणखी एक विसंगती आढळून आली आहे, ज्याचा आकार रिमोट इमेजिंगद्वारे स्पष्ट होऊ शकलेला नाही. संशोधकांच्या मते, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असू शकतात. निसर्गात भूगर्भीय हालचालींमुळे अचानक काटकोनात रचना तयार होत नाहीत. त्यामुळे हा 'L' आकार मानवनिर्मित असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. अभ्यासकांच्या मते, ही रचना जमिनीखाली असलेल्या एखाद्या गुप्त तळघराचा, बोगद्याचा किंवा समाधीचा प्रवेशद्वार असू शकते. मात्र, तिथे नेमके काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news