

लंडन : सुमारे वीस वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली होती, ज्यामध्ये अवघ्या 12 वर्षांच्या एका मुलीने बाळाला जन्म दिला होता. तत्कालीन प्रसारमाध्यमांनी तिला युनायटेड किंगडममधील सर्वात तरुण माता म्हणून घोषित केले होते. आज वीस वर्षांनंतर, 32 वर्षांच्या ट्रेसा मिडलटनने तिच्या खडतर आयुष्याचा प्रवास आणि ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडून चार मुलांची एक सुखी माता बनण्यापर्यंतचा संघर्ष जगासमोर आणला आहे.
2006 मध्ये ट्रेसा अवघ्या 12 वर्षांची असताना तिने एका मुलीला (ऍनी) जन्म दिला. सुरुवातीला ती एका पार्टीत मद्यधुंद अवस्थेत गरोदर राहिली अशी बातमी तिच्या आईनेच पैशांसाठी माध्यमांना विकली होती. मात्र, 2010 मध्ये समोर आलेले सत्य अत्यंत भयानक होते. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून ट्रेसावर तिच्या सख्ख्या मोठ्या भावाने (जॅसन) लैंगिक अत्याचार केले होते आणि ते बाळ त्याचेच होते. या गुन्ह्यासाठी जॅसनला 2009 मध्ये चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. परिस्थितीमुळे ट्रेसाच्या पहिल्या मुलीला कायदेशीररित्या दत्तक देण्यात आले.
या मानसिक धक्क्यामुळे ट्रेसा तिच्या किशोरवयात आणि विशीत हेरॉईन सारख्या अमली पदार्थांच्या आहारी गेली. तिचा जोडीदार डॅरेन यंग याच्यासोबत मिळून ड्रग्जसाठी ती चोर्याही करू लागली होती. ‘आम्ही दोघे जिवंत आहोत याचेच मला आश्चर्य वाटते, त्या नरकयातनांसारख्या आयुष्यात मला पुन्हा कधीच जायचे नाही,’ असे ट्रेसा सांगते. आज ट्रेसा 32 वर्षांची असून, तिला अरिहाना (वय 8), हार्लो (4), फ्रेया (2) या तीन मुली आणि केरेन (3 महिने) हा एक मुलगा आहे. आपल्या मुली आता त्याच वयात येत आहेत ज्या वयात तिच्यावर अत्याचार झाले होते, त्यामुळे ती त्यांच्या सुरक्षेबाबत अत्यंत सतर्क असते. बालपणात शिक्षण पूर्ण करू न शकलेली ट्रेसा आता नशामुक्ती केंद्रात समुपदेशक म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची इच्छा बाळगून आहे.