

लंडन : इंग्लंडच्या उत्तरेतील एका प्राचीन रोमन किल्ल्यात उत्खनन करताना पुरातत्त्वज्ञांना मोठ्या आकाराचा कातडी बूट सापडला आहे. ‘अॅन्कल-ब्रेकर’ नावाच्या संरक्षण खंदकाच्या तळाशी हा बूट सापडला. हा किल्ला मॅग्ना या नावाने ओळखला जातो. हा बूट आणि त्याचबरोबर सापडलेले इतर चामड्याचे अवशेष जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचे असून, त्यावरून त्या काळातील जोडा बनवण्याच्या तंत्रांची आणि त्याचे वापरकर्ते कसे होते याची माहिती मिळत आहे.
‘एक जोडा ही अतिशय वैयक्तिक वस्तू आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पूर्वी राहणार्या लोकांशी नाते जोडल्यासारखं वाटतं,’ असं मॅग्ना प्रकल्पात सहभागी असलेल्या एका स्वयंसेवकाने उत्खनन ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. इ. स. 122 च्या सुमारास हॅड्रिअन्स वॉल या उत्तर सीमेवरील भिंतीच्या बांधकामानंतर रोमन लष्कराने ब्रिटनमधील लहान किल्ल्यांचा ताबा घेतला आणि त्यांचा विस्तार केला. मॅग्ना, ज्याला कारव्होरन असंही म्हणतात, हा हाच भाग असलेला एक किल्ला आहे. तो विंडोलांडा या सुप्रसिद्ध किल्ल्यापासून सुमारे 11 किलोमीटर पश्चिमेस आहे.
विंडोलांडामध्ये लेखनफलक, पदके आणि चामड्याचे बूट यांचे अप्रतिम अवशेष सापडले आहेत. मार्चअखेरीस पुरातत्त्वज्ञांनी मॅग्नाच्या उत्तर भिंतीबाहेरील संरक्षण खंदक, भराव आणि तटबंदीचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रकल्पातील वरिष्ठ पुरातत्त्वज्ञ रेचेल फ्रेम यांच्या मते, खंदकाच्या तळाशी त्यांना एक अतिशय अरुंद आणि खोल चर सापडला, ज्याला ‘अॅन्कल-ब्रेकर’ म्हणतात. पाण्याखाली झाकले गेलेला हा चर शत्रूच्या सैनिकाचा पाय अडकवून टाच मोडण्यास कारणीभूत ठरायचा. या खंदकात पुरातत्त्वज्ञ आणि स्वयंसेवकांना तीन बूट आणि चामड्याचे तुकडे सापडले, जे शेकडो वर्षे ऑक्सिजनशून्य वातावरणात चांगल्या स्थितीत टिकून राहिले.