

केप कॅनव्हेरल (अमेरिका) : सूर्यमालेतील सुंदर कड्यांचा ग्रह असलेल्या शनीने (सॅटर्न) खगोलशास्त्रज्ञांना पुन्हा एकदा थक्क केले आहे. शनीच्या दक्षिण ध्रुवावरील (साऊथ पोल) बर्फाच्छादित अमोनियाच्या ढगांमध्ये वैज्ञानिकांना एका महाकाय दशकोनी अर्थात १० बाजू असणाऱ्या भूमितीय आकाराची (डेकागॉन) चक्राकार रहस्यमयी लाट आढळली आहे.
स्पॅनिश संशोधकांच्या नेतृत्वाखालील टीमने ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी १९८० च्या दशकात ‘नासा’च्या ‘व्हायेजर’ मोहिमेने शनीच्या उत्तर ध्रुवावर ६ बाजूंचा ‘षटकोन’ (‘हेक्सागॉन’) शोधला होता. आता दक्षिण ध्रुवावर आढळलेला हा १० बाजूंचा ‘डेकागॉन’ त्या षटकोनापेक्षाही मोठा आणि अस्थिर असल्याचे समोर आले आहे.
‘नासा’च्या हबल स्पेस टेलिस्कोपद्वारे २०२३ मध्ये घेतलेल्या छायाचित्रांमध्ये ही रचना पहिल्यांदा दिसून आली. २०१७ ते २०२३ दरम्यान शनीचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला झुकलेला असल्याने तो दिसत नव्हता. याच काळात ही वावटळ तयार झाली असावी, असा अंदाज आहे. या दशकोनी आकाराची केवळ एक बाजू १०,००० मैलांपेक्षा (१६,७०० किलोमीटर) जास्त लांब आहे. शनीचा उत्तर ध्रुवावरील षटकोन एकाच जागी स्थिर आहे; परंतु हा नवा ‘डेकागॉन’ ताशी १० किलोमीटर (६ मैल) या मंदगतीने पूर्वेकडे सरकत आहे. सूर्यमालेत वातावरण असलेले अनेक ग्रह आहेत; परंतु केवळ शनी ग्रहावरच ढगांच्या अशा सरळ रेषा असणाऱ्या भूमितीय आकृत्या (पॉलिगॉन्स) तयार होतात. या अभ्यासाचे प्रमुख लेखक ऑगस्टिन सांचेझ-लावेगा यांच्या मते, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील या दोन भिन्न रचनांची तुलना केल्यास शनीसारख्या महाकाय ‘गॅस जायंट’ ग्रहांचे हवामान समजणे सोपे होईल. शनीचा उत्तर ध्रुवावरील षटकोन गेली ४० वर्षे टिकून आहे; मात्र हा नवा १० बाजूंचा ‘डेकागॉन’ किती काळ टिकेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.