

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांना दोन दूरच्या बटू आकाशगंगांना जोडणारा 1,85,000 प्रकाशवर्ष लांबीचा वायूचा एक विशाल आणि रहस्यमय पूल सापडला आहे. या शोधातून आकाशगंगा अवकाशात एकमेकांशी कशा प्रकारे संवाद साधतात, याबद्दल नवीन द़ृष्टी मिळाली आहे.
इंटरनॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी रिसर्च (ICRAR), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टीमने हा पूल शोधला आहे. ‘मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, प्रोफेसर लिस्टर स्टेव्हली-स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील खगोलशास्त्रज्ञांच्या गटाने हा महत्त्वपूर्ण शोध नोंदवला आहे. या टीमला NGC 4532 आणि DDO 137 या दोन आकाशगंगांना जोडणारा ‘न्यूट्रल हायड्रोजन वायूचा’ एक प्रचंड पूल आढळला आहे.
पृथ्वीपासून सुमारे 53 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या या आकाशगंगा एका वायूच्या प्रवाहाने एकत्र जोडल्या गेल्या आहेत. या शोधाचे महत्त्व त्याच्या प्रचंड आकारात आहे. हा पूल 1,85,000 प्रकाशवर्ष लांबीचा आहे आणि अशा प्रकारच्या सापडलेल्या सर्वात मोठ्या रचनांपैकी एक आहे. या विशाल वायूच्या पुलासोबतच, आणखी 1.6 दशलक्ष प्रकाशवर्ष लांबीची एक शेपटी आहे. आकाशगंगांच्या परस्परसंवादात वायूची गती कोणती भूमिका बजावते, याचा अभ्यास करण्याची ही एक अभूतपूर्व संधी आहे.
या अभ्यासातून विरगो क्लस्टरसारख्या घन वातावरणातील अवकाशीय रचना आणि आकाशगंगांच्या उत्क्रांतीला आकार देणार्या शक्तींची सखोल माहिती मिळते. विरगो क्लस्टर हा विश्वातील सर्वात महत्त्वाच्या आकाशगंगा क्लस्टर्सपैकी एक आहे. या शोधाचा सर्वात मनोरंजक पैलू म्हणजे टाईडल फोर्स (आकाशगंगांमधील गुरुत्वाकर्षणामुळे होणारे परस्परसंवाद) आणि या आकाशगंगांची विरगो क्लस्टरशी असलेली जवळीक.