Giant fungus | डायनासोर नामशेषानंतर जंगलावर राज्य करत होती महाकाय बुरशी!

Giant fungus |
Giant fungus | डायनासोर नामशेषानंतर जंगलावर राज्य करत होती महाकाय बुरशी!
Published on: 
Updated on: 

बीजिंग : सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवरून महाकाय डायनासोर नामशेष झाले, तेव्हा पृथ्वीच्या अंधाऱ्या आणि थंड वातावरणात ज्या सजीवांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले, त्यापैकी एका अत्यंत दुर्मीळ आणि महाकाय बुरशीचा (फंगस) शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. नैऋत्य चीनमधील जंगलात सापडलेल्या या अनोख्या मशरूमला ‘डायंजुनस रेक्स’ असे नाव देण्यात आले आहे. अर्ध्या मीटरपर्यंत उंची आणि तब्बल २.२ किलोग्रॅम वजन असलेली ही बुरशी आपल्या प्रजातीतील जगातील सर्वात मोठी बुरशी ठरली आहे.

शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे लागला शोध

‘फ्रंटियर्स इन फंगल बायोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २०२४ मध्ये चीनमधील युनान प्रांतातील उष्णकटिबंधीय वर्षावनात शास्त्रज्ञ बुरशीच्या विविधतेचे सर्वेक्षण करत होते. त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना एका विचित्र आकाराच्या पिवळसर-पांढऱ्या मशरूमचे फोटो पाठवले. काही शेतकऱ्यांनी या बुरशीचा छोटा तुकडा खाऊन पाहिला होता आणि ती खाण्यायोग्य आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांनी संशोधकांशी संपर्क साधला होता.

कुनमिंग इन्स्टिट्यूट ऑफ बॉटनीच्या शास्त्रज्ञ इंदुनिल चिंथानी सेनानायके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असता, कुजलेल्या झाडांच्या मुळांवर तंबू आणि चमच्यासारख्या आकाराचे महाकाय मशरूम वाढलेले दिसले. हे मशरूम ‘अ‍ॅस्कोमायसेट’ किंवा ‘सॅक फंगाय’ गटातील आहेत, ज्यांचे आकार सामान्यतः काही सेंटीमीटर इतके लहान असतात; मात्र या नव्या प्रजातीची उंची ५० सेंटीमीटर (अर्धा मीटर) आणि वजन २.२ किलोपर्यंत आढळले. प्रयोगशाळेतील डीएनए तपासणीनंतर ही बुरशी एका पूर्णपणे नवीन आणि स्वतंत्र कुटुंबातील असल्याचे स्पष्ट झाले. या भागातील प्राचीन ‘डायन’ राजवट आणि लॅटिन भाषेतील ‘रेक्स’ (राजा) या शब्दावरून तिचे नाव ‘डायंजुनस रेक्स’ ठेवले गेले.

डायनासोर नामशेष होण्याशी संबंध

जनुकीय विश्लेषणातून असे समोर आले आहे की, या बुरशीच्या कुटुंबाची उत्क्रांती ६.५ कोटी वर्षांपूर्वी डायनासोर नष्ट करणाऱ्या महाप्रलयानंतर लगेचच झाली. त्या काळात सूर्यप्रकाशाअभावी वनस्पती नष्ट होत असताना, मृत सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या या बुरशीने पृथ्वीवर आपले वर्चस्व निर्माण केले होते.