

बीजिंग : चीनमध्ये यापूर्वी कधीही पाहण्यात न आलेल्या प्रजातीमधील महाकाय डायनासोरचे जीवाश्म आढळले आहे. त्यामध्ये या डायनासोरच्या कवटीचा सुरक्षित राहिलेला भाग आहे. सुरुवातीच्या काळातील सॉरोपॉड्सचे हे डायनासोर जवळचे नातेवाईक होते. दक्षिण चीनच्या युनान प्रांतातील लुफेंग डायनासोर नॅशनल जिओपार्कमध्ये हे जीवाश्म सापडले. हे डायनासोर 33 फूट लांबीचे होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
या प्रजातीचे नाव ‘लिशुलोंग वांगी’ असे आहे. ते ‘सॉरोपोडोमॉर्फ्स’ या समूहातील होते. त्यामध्येच ब्रोटोसॉरस आणि डायप्लोडोकस या सॉरोपॉड्सचा व त्यांच्या पूर्वजांचा समावेश होतो. जमिनीच्या ज्या स्तरामध्ये या डायनासोरचे जीवाश्म सापडले, तो स्तर सुरुवातीच्या ज्युरासिक हेटँजियन काळातील म्हणजेच 201.3 दशलक्ष ते 199.3 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘पिअर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लुफेंगमध्ये सापडलेले हे सॉरोपॉड्सशिवायच्या सर्वात मोठ्या डायनासोरचे पहिलेच जीवाश्म आहे. सुरुवातीच्या काळातील सॉरोपोडोमॉर्फ्सचा याठिकाणी मोठा वावर होता.
चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमधील पॅलिओंटोलॉजिस्ट कियान-नान झांग यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. नद्या आणि सरोवरांच्या गाळात अडकलेले डायनासोरचे अवशेष याठिकाणी जतन झालेले आहेत. तिथेच या डायनासोरच्या कवटीचा भागही जतन झालेला आहे. त्यामध्ये डायनासोरचा जबडा, त्याचे दातही पाहायला मिळतात. हे मोठ्या आकाराचे शाकाहारी डायनासोर होते.