

पर्थ : पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या एका समुद्रकिनार्यावर शास्त्रज्ञांना 13 कोटी वर्षे जुन्या डायनासोरच्या पाऊलखुणांचा प्रचंड मोठा साठा सापडला आहे. डायनासोरच्या जगाबद्दलचे अनेक नवीन रहस्य उलगडण्यासाठी हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या ठिकाणी डायनासोरच्या पाऊलखुणांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि वैविध्यपूर्ण संकलन मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियात या काळातील डायनासोरच्या हाडांचे सांगाडे फार कमी आढळतात, त्यामुळे या पाऊलखुणा ऐतिहासिक पुराव्यासाठी मोलाच्या ठरत आहेत. संशोधकांनी 2011 ते 2016 या कालावधीत 25 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनार्यावर 400 तासांहून अधिक काळ शोधमोहीम राबवली. या खुणा मोजण्यासाठी थ—ीडी फोटोग्राफी आणि मातीच्या थरांची तपासणी करणार्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
हजारो पाऊलखुणा : शास्त्रज्ञांना येथे हजारो खुणा सापडल्या असून, त्यापैकी 150 खुणांची पूर्णपणे पुष्टी झाली आहे. यामध्ये थेरोपोड, सॉरोपोड, ऑर्निथोपोड आणि थायरोफोरन यांसारख्या प्रजातींचा समावेश आहे.
विशाल आकार : येथे लांब मान असलेल्या डायनासोरच्या पाऊलखुणा तब्बल 1.75 मीटर लांब आहेत. म्हणजेच डायनासोरच्या एका पायाचा ठसा एका सरासरी माणसाच्या उंचीएवढा मोठा आहे.
स्टेगोसॉरचा शोध : शास्त्रज्ञांना येथे पहिल्यांदाच ‘स्टेगोसॉर’ च्या पाऊलखुणांचे पक्के पुरावे मिळाले आहेत. हा तोच डायनासोर आहे ज्याच्या पाठीवर हाडांच्या मोठ्या प्लेटस् आणि शेपटीवर काटे असायचे.
संशोधकांना अशा 48 जागा मिळाल्या आहेत जिथे डायनासोरच्या पावलांचे स्पष्ट ठसे आहेत. यातील काही खुणा 1967 मध्ये शोधलेल्या ‘ब्रूमेन्सिस’ सारख्या ओळखीच्या प्रजातींच्या आहेत, तर अनेक खुणा तुटलेल्या अवस्थेत असल्याने त्या नेमक्या कोणत्या प्रजातींच्या आहेत, हे निश्चित करणे अद्याप बाकी आहे. हा शोध सिद्ध करतो की, ज्या डायनासोरचे सांगाडे आजवर कधीही सापडले नाहीत, अशाही प्रजाती या भागात वावरत होत्या. ऑस्ट्रेलियाच्या नैसर्गिक इतिहासातील हा एक सुवर्णक्षण मानला जात आहे.