

वॉशिंग्टन : सौरमालेतील सर्वात मोठी दरी मानल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहावरील 'व्हॅलेस मरीनरीस' (Valles Marineris) या अवाढव्य दरीबाबत वैज्ञानिक जगतातून एक अत्यंत थक्क करणारी बातमी समोर आली आहे. पृथ्वीवरील प्रसिद्ध 'ग्रँड कॅनियन'पेक्षा सुमारे ९ ते १० पट लांब आणि ५ पट खोल असलेली ही विशालकाय दरी आज कोट्यवधी वर्षांनंतरही भूगर्भीयदृष्ट्या (Tectonically Active) जिवंत आणि सक्रिय असल्याचे नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
नासाच्या 'इंसाईट' लँडरने नोंदवलेल्या एका दुर्मीळ मंगळ-भूकंपाच्या (Marsquake) डेटाचे विश्लेषण करताना 'इम्पेरियल कॉलेज लंडन' आणि 'कोलंबिया युनिव्हर्सिटी'च्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. यासंदर्भातील संशोधन 'नेचर कम्युनिकेशन्स' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. इंसाईट लँडरने २५ ऑगस्ट २०२१ रोजी 'S0976a' नावाचा एक विशेष भूकंप नोंदवला होता. याचे केंद्र 'व्हॅलेस मरीनरीस' या दरीच्या खाली २० ते ४० किलोमीटर खोल भूगर्भात आढळले. शास्त्रज्ञांच्या मते, ही दरी बनताना अब्जावधी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या भूगर्भीय भेगा (Fault lines) अजूनही पूर्णपणे शांत झालेल्या नाहीत.
या भेगांच्या दोन्ही बाजूंचे खडक अजूनही सरकत असून (Strike-slip motion) त्यामुळे मंगळावर भूकंप होत आहेत. आतापर्यंत मंगळ ग्रहाला भूगर्भीयदृष्ट्या 'शांत किंवा मृत ग्रह' मानले जात होते. मात्र, या शोधामुळे मंगळाचा पृष्ठभाग अजूनही आतून बदलत असल्याचे सिद्ध झाले आहे. ही दरी तब्बल ३,९०० किलोमीटर लांब आणि ६० cut किलोमीटर रुंद आहे. तिची खोली सुमारे ९ किलोमीटरपेक्षा जास्त आहे. अमेरिकेतील ग्रँड कॅनियनच्या तुलनेत ही दरी जवळपास ९ ते १० पट लांब, २० पट रुंद आणि ५ पट जास्त खोल आहे. ही सौरमालेतील सर्वात मोठी दरीची रचना (Canyon System) मानली जाते.
पृथ्वीवर जमिनीच्या खाली असलेल्या 'टेक्टोनिक प्लेट्स' एकमेकांवर घासल्यामुळे किंवा एकमेकांखाली सरकल्यामुळे भूकंप होतात. परंतु, मंगळावर अशा वेगवेगळ्या प्लेट्स नाहीत. त्याचा वरचा भाग एका अखंड कवचासारखा (Single Lid) आहे. ग्रह हळूहळू थंड होत असताना हे कवच आकुंचन पावते आणि त्यात दाब निर्माण होतो. याच दाबामुळे अब्जावधी वर्षांपूर्वी बनलेल्या जुन्या भेगांमध्ये अंतर्गत हालचाल होऊन मंगळावर धक्के बसतात, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. या अभ्यासाचे प्रमुख शास्त्रज्ञ जुंग-हुन सोंग यांनी सांगितले की, "व्हॅलेस मरीनरीस ही केवळ एक जुनी, अवशेष बनलेली निर्जीव वास्तू नाही, तर ती आजही अंतर्गत हालचालींनी बदलणारी एक जिवंत रचना आहे, हे या भूकंपाने दाखवून दिले आहे."