Statue of Lord Buddha | 18 टनाच्या जेड शिळेतून साकारली भगवान बुद्धांची भव्य मूर्ती

Statue of Lord Buddha |
Statue of Lord Buddha | 18 टनाच्या जेड शिळेतून साकारली भगवान बुद्धांची भव्य मूर्ती
Published on
Updated on

सिडनी : निसर्ग नेहमीच आपल्या अथांग गर्भात दडलेल्या मौल्यवान भेटींनी आपल्याला थक्क करत असतो. जमिनीच्या उत्खननात असा एक मौल्यवान दगड सापडणे आणि नंतर त्याचे रूपांतर भगवान बुद्धांच्या एका भव्य मूर्तीमध्ये होणे, ही एखाद्या कल्पनेसारखी वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. या अद्भुत प्रतिमेला आज जगभरात ‘जेड बुद्ध फॉर युनिव्हर्सल पीस’ (सर्वत्र शांततेसाठी जेड बुद्ध) म्हणून ओळखले जाते.

या मूर्तीची कथा 2000 मध्ये कॅनडातील वायव्य ब्रिटिश कोलंबिया भागात सुरू झाली. तिथे उत्खनन सुरू असताना जमिनीच्या आत सुमारे 18 टनांचा एक अतिशय जड आणि उत्कृष्ट दर्जाचा जेड दगड सापडला. या विशाल शिळेला ‘पोलर प्राईड’ असे नाव देण्यात आले. तज्ज्ञांनी जेव्हा याची तपासणी केली, तेव्हा त्याचा गडद हिरवा रंग आणि शुद्धता पाहून ते थक्क झाले. इतक्या मोठ्या आकाराचा आणि उच्च दर्जाचा जेड दगड मिळणे ही जगाच्या इतिहासातील दुर्मीळ घटना मानली जाते. या दुर्मीळ शोधामुळे प्रभावित होऊन एका बौद्ध मठाने या 18 टन शिळेचा अर्धा भाग विकत घेतला.

अतिशय कौशल्याने आणि श्रद्धेने या दगडावर कोरीवकाम करून भगवान बुद्धांची एक अतिशय सुंदर आणि शांत प्रतिमा साकारण्यात आली. आज ही मूर्ती ऑस्ट्रेलियातील ‘ग्रेट स्तूप ऑफ युनिव्हर्सल कम्पॅशन’ मध्ये कायमस्वरूपी स्थापित करण्यात आली आहे. जगभरातील लोकांना ही मूर्ती पाहता यावी, यासाठी ती अधूनमधून विविध देशांतील प्रदर्शनांमध्येही पाठवली जाते. ज्या दगडापासून ही मूर्ती बनली आहे, त्याला विज्ञानाच्या भाषेत नेफ्राइट जेड म्हटले जाते.

जेड दगडाचे मुख्य दोन प्रकार असतात, त्यापैकी नेफ्राइट हा त्याच्या मजबुतीसाठी, चमकदार पृष्ठभागासाठी आणि मनमोहक हिरव्या रंगासाठी प्रसिद्ध आहे. हा दगड अत्यंत टिकाऊ असतो, म्हणूनच प्राचीन काळापासून दागिने आणि मूर्ती बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. कॅनडाचा ब्रिटिश कोलंबिया प्रांत अशा खास दगडांचे प्रमुख केंद्र आहे. येथील खाणींमधून निघणारा उच्च दर्जाचा नेफ्राइट जेड जगभरात ओळखला जातो. जेड दगडांचे उत्पादन आणि निर्यात यामध्ये कॅनडा जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news