

भोपाळ : मध्य प्रदेशातील खरगोन येथील प्राचीन व ऐतिहासिक सिद्धिविनायक गणेश मंदिरात रक्षाबंधनानिमित्त श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. येथे श्रीगणेशाला एका भगिनीकडून १६ चौरस फुटांची भव्य राखी बांधण्यात आली. विशेष म्हणजे, ही अवाढव्य राखी पलक नावाच्या या तरुणीने स्वतः सुमारे १५ दिवस मेहनत करून तयार केली आहे. ही राखी अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यावर देशातील १२ ज्योतिर्लिंगांची चित्रे साकारण्यात आली आहेत.
खरगोनमध्ये रक्षाबंधन सणाची सुरुवात सर्वप्रथम श्रीगणेशाला राखी बांधून करण्याची अनेक वर्षांची जुनी परंपरा आहे. याच परंपरेचे पालन करत शुक्रवारी सकाळी सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाला विधिवत पूजा करून ही विशाल राखी अर्पण करण्यात आली. यानंतर भाविकांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यास सुरुवात केली. या अवाढव्य राखीवर साकारलेली १२ ज्योतिर्लिंगांची चित्रे भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. ही अनोखी राखी पाहण्यासाठी आणि श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
लोकांनी या भव्य राखीचे फोटो काढले आणि ही श्रद्धा व सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. राखी तयार करणाऱ्या पलक हिने सांगितले की, ‘भगवान श्रीगणेशाला ही राखी लोकांचे रक्षण व्हावे आणि खरगोनसह संपूर्ण राज्य व देशात सुख-समृद्धी यावी, या प्रार्थनेसह बांधण्यात आली आहे.’ मंदिराचे पुजारी प्रणय भट यांनी सांगितले की, सिद्धिविनायक गणेश मंदिरात श्रीगणेशाला पहिली राखी बांधण्याची परंपरा वर्षांनुवर्षे चालत आली आहे. खरगोनमध्ये अशी धारणा आहे की, सर्वात आधी श्रीगणेशाला राखी बांधली जाते आणि त्यानंतरच भाऊ-बहीण रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. हीच परंपरा जपत दरवर्षी सिद्धिविनायकाला विशेष राखी अर्पण केली जाते.