

समस्तीपूर : गाव-खेड्यांमध्ये पावसाळ्यात प्रमाणापेक्षा थोडा जास्त पाऊस झाला किंवा वीज पडणे सुरू झाले तरी वीजपुरवठा खंडित होतो. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा खंडित केला जातो, तर काही वेळा तांत्रिक बिघाडामुळे अशी परिस्थिती उद्भवते. ग्रामीण भागात विजेचा ट्रान्स्फॉर्मर बिघडल्यानंतर दुरुस्तीसाठी काही दिवसही लागू शकतात. पण, एकच ट्रान्स्फॉर्मर पुन्हा-पुन्हा बिघडत असल्यास गावकर्यांचे किती हाल होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी. बिहारमधील समस्तीपूरमध्ये असाच एक किस्सा घडला. पण, यानंतर त्यातून जो निष्कर्ष काढला गेला, तो मात्र आणखी थक्क करणारा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करताना ग्रामस्थ व इलेक्ट्रिशियनची दमछाक झाली. वीज विभागाकडून त्यांना विशेष मदत मिळाली नाही. वैतागलेल्या इलेक्ट्रिशियनने ग्रामस्थांना सांगितलं, की ट्रान्स्फॉर्मरला भुताने पछाडले आहे आणि म्हणूनच तो पुन-पुन्हा खराब होत आहे. ट्रान्स्फॉर्मरवर भूत असल्याचे ऐकून ग्रामस्थांनी भूत पळवण्यासाठी भगताला बोलावलं. भगतदेखील ढोल-मंजिरा घेऊन संपूर्ण टीमसह ट्रान्स्फॉर्मरजवळ आला. भूत पळवण्यासाठी पूजा सुरू करण्यात आली. ही पूजा बघण्यासाठी ग्रामस्थ जमा झाले. सरतेशेवटी, भगताने ग्रामस्थांना सांगितलं, की ट्रान्स्फॉर्मर भुतामुळे नाही तर तांत्रिक कारणामुळे बिघडत आहे. वीज विभागाची टीमच त्याला दुरुस्त करू शकेल.
ग्रामस्थांनी आरोप केला आहे, की याबाबत वीज विभागाकडे अनेकदा तक्रार करूनही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे इलेक्ट्रिशियनचे म्हणणे ऐकून भूत पळवण्यासाठी गावकर्यांनी भगताला बोलावलं; पण त्याचाही उपयोग झाला नाही. सोशल मीडिया युझर्सनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने कमेंट केली, की सोशल मीडिया, मोबाईल फोन, कॅमेरा उपलब्ध नसता तर हे सर्व आपल्याला बघता आले नसते. आणखी एकाने कमेंट केली, की भुताला पळवून लावले जात आहे की बोलावले जात आहे, हेच समजत नाही. आणखी एका युझरने म्हटले आहे, की यामुळेच बिहार प्रगतीच्या बाबतीत आघाडीवर आहे. एक युझर म्हणाला, ‘काही दिवसांपूर्वी एक स्त्री नागीण बनल्याचा व्हिडीओ बघितला होता. आता भगत ट्रान्स्फॉर्मरमधून भूत काढत असल्याचा व्हिडीओ दिसत आहे.’