

बर्लिन : घोडा म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उंचापुरा, उमदा घोडा उभा राहतो. मात्र, हा घोडा एखाद्या वासराइतका किंवा त्यापेक्षाही लहान आकाराचा आहे. या घोड्यामुळे जर्मनीतील एक छोटेसे शेत लोकांचे खास आकर्षण बनले आहे. हा घोडा इतका लहान आहे की, त्याने ‘जगातील सर्वात लहान घोडा’ होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या चिमुकल्या घोड्याचे नाव आहे ‘पुमुकल.’ त्याची उंची फक्त 52.6 सेंटिमीटर आहे, म्हणजेच तो आपल्या गुडघ्यापर्यंतही नाही. हा घोडा आकारात लहान असला, तरी त्याचे हावभाव आणि वागणे मोठ्या घोड्यांपेक्षा कमी नाही.
‘पुमुकल’ जर्मनीतील एका फार्मवर त्याची मालकीण कॅरोला वायडेमान यांच्यासोबत राहतो. कॅरोला त्याला प्रेमाने ‘स्टार ट्रीटमेंट’ देतात, म्हणजेच त्याची काळजी एका सेलिबिटीप्रमाणे घेतली जाते. त्याच्या खाण्यापिण्यापासून ते राहण्यापर्यंत सर्व गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे, ‘पुमुकल’ला विक्रम करण्यासाठी पाळले गेले नव्हते. थेरपी घोड्यांसोबत काम करणाऱ्या कॅरोला यांच्या एका मित्राने जेव्हा या अत्यंत लहान तट्टूबद्दल सांगितले, तेव्हा त्या त्याला फार्मवर घेऊन आल्या.
कॅरोला यांच्या मते, ‘पुमुकल’चा इतका लहान आकार हा मानवी प्रयत्नांचा नव्हे, तर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. विक्रम मोडणारी उंची असूनही, ‘पुमुकल’ आळशी जीवन जगत नाही. तो आपला बहुतेक वेळ फार्ममध्ये इकडे-तिकडे फिरून ‘काम’ करत घालवतो आणि त्यानंतर इतर घोड्यांसोबत शेतात आराम करताना दिसतो. त्याची मैत्री फक्त घोड्यांपुरती मर्यादित नाही. ‘पुमुकल’ फार्ममधील मांजरीसह इतर प्राण्यांसोबतही खेळताना दिसतो. यामुळेच लोक त्याला मनमिळाऊ आणि कोणत्याही वातावरणात जुळवून घेणारा घोडा मानतात.
‘पुमुकल’ हा कोणताही शोपीस नसून, तो एका थेरपी घोड्याच्या रूपात काम करतो आणि सगळ्यांचा लाडका साथीदार आहे. ‘पुमुकल’च्या या यशामुळे रेकॉर्ड बुक बदलले आहे. त्याने पूर्वीचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी सर्वात लहान घोड्याचा विक्रम ‘बॉम्बेल’ नावाच्या घोड्याच्या नावावर होता. पोलंडच्या या घोड्याची उंची 56.7 सेंटिमीटर होती. ‘पुमुकल’ ‘बॉम्बेल’पेक्षा चार सेंटिमीटरने लहान आहे.