

लंडन ः ज्याप्रमाणे गुन्हेगारी जगतात एखाद्या संशयिताला गुन्ह्याच्या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी भौतिक पुरावा म्हणून ‘फिंगरप्रिंटिंग’ तंत्रज्ञानाने क्रांती घडवून आणली; अगदी त्याचप्रमाणे, आता ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ वैद्यकीय क्षेत्रात आजारांचा शोध घेणार्या ‘डिसीज डिटेक्टिव्हज’साठी एक गेमचेंजर ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे एखाद्या विषाणू किंवा जीवाणूची जनुके वाचून, तो आजार कुठून आला आणि कसा पसरला, याची संपूर्ण जैविक नोंद शास्त्रज्ञांना मिळवता येत आहे.
सिक्वेन्सिंग समजून घेण्यासाठी एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या जीनोमची तुलना ‘रेसिपी बुक’ (पाककृतींचे पुस्तक) सोबत करता येईल. या पुस्तकातील प्रत्येक जनुक म्हणजे प्रोटीन तयार करण्याची एक रेसिपी आहे. शास्त्रज्ञ जेव्हा एखाद्या रोगजंतूचे सिक्वेन्सिंग करतात, तेव्हा ते या रेसिपीमधील जेनेटिक अक्षरांचा क्रम वाचतात. काळानुसार जसा या रोगजंतूंमध्ये बदल होतो, तसे या रेसिपीमध्ये लहान-लहान बदल दिसू लागतात.
वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि वेगवेगळ्या वेळी गोळा केलेल्या नमुन्यांमधील या बदलांची तुलना करून, संशोधक हे शोधू शकतात की कोणते संक्रमण एकमेकांशी संबंधित आहे. तसेच, हा रोगजंतू मानवी वस्तीत कधी आणि कुठे दाखल झाला असावा, याचा अंदाजही लावता येतो. शास्त्रज्ञांनी यापूर्वी कोविड-19, इबोला, एमपॉक्स आणि दूषित अन्नातून होणार्या आजारांचा मागोवा घेण्यासाठी या पद्धतीचा यशस्वी वापर केला आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य तपासनीसांना अशा केसेस एकमेकांशी जोडण्यास मदत करते, ज्या एरवी पूर्णपणे वेगवेगळ्या वाटू शकतात.
जीनोम सिक्वेन्सिंग अत्यंत प्रभावी असले तरी त्याला काही मर्यादा आहेत. हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या रोगजंतूंचे प्रकार एकमेकांशी संबंधित आहेत हे दाखवू शकते, परंतु एखादी साथ नेमकी त्याच ठिकाणी का सुरू झाली? ती एका विशिष्ट दिशेनेच का पसरली? मानवी वर्तनाने या साथीचा मार्ग कसा ठरवला? या प्रश्नांची उत्तरे जीनोम सिक्वेन्सिंग एकटे देऊ शकत नाही. यासाठी जेनेटिक डेटासोबत ऐतिहासिक नोंदी, पुरातत्वीय वस्तू, व्यापारी रेकॉर्ड आणि महामारीविषयक तपासाची सांगड घालणे आवश्यक आहे.