

रिओ दि जानेरो : अर्जेंटिनाच्या ग्रामीण भागात काही कोवळी शिंगरे शांतपणे गवत खाताना दिसतात; पण ही साधीसुधी शिंगरे नाहीत. ही जगातील पहिली जनुकीय संपादित (जीन एडिटेड) घोडी आहेत, ज्यांना ‘क्रिसपर’ तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक वेगवान आणि शक्तिशाली बनवण्यासाठी तयार केले आहे. या क्रांतिकारी प्रयोगामुळे पोलो या राजेशाही खेळात मात्र मोठे वादळ निर्माण झाले आहे.
अर्जेंटिनाच्या ‘खिरॉन बायोटेक’ या कंपनीने एका प्रसिद्ध पोलो घोड्याचे क्लोन तयार करून त्यांच्या डीएनएमध्ये बदल केले आहेत. घोड्यांच्या स्नायूंची वाढ मर्यादित करणार्या ‘मायोस्टॅटिन’नावाच्या जनुकामध्ये बदल करून त्यांना अफाट वेग आणि ताकद मिळवून देणे हा यामागील उद्देश आहे.
यासाठी ‘क्रिसपर’ या अत्याधुनिक जनुकीय संपादन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, जे डीएनएमधील विशिष्ट भाग कापून त्यात अचूक बदल करू शकते.
पोलो खेळासाठी अर्जेंटिना जगभरात प्रसिद्ध आहे आणि येथे घोड्यांच्या प्रजननासाठी क्लोनिंगसारखे तंत्रज्ञान आधीपासूनच वापरले जाते; मात्र जनुकीय तंत्रज्ञानाच्या वापराला तीव्र विरोध होत आहे. अर्जेंटिनाच्या पोलो असोसिएशनने या जनुकीय संपादित घोड्यांना स्पर्धांमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष बेंजामिन अराया यांच्या मते, यामुळे प्रजननाची मूळ जादू आणि आकर्षणच नष्ट होईल. एका उत्तम घोड्याची आणि घोडीची निवड करून त्यांच्यापासून एक चांगले शिंगरू जन्माला येण्याची वाट पाहण्यात जास्त आनंद आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अनेक पारंपरिक ब्रीडर्सनीदेखील (प्रजनन करणारे) जनुकीय तंत्रज्ञानाच्या वापराला विरोध दर्शवला आहे. माजी पोलोपटू मार्कोस हेगुय म्हणतात, हे तंत्रज्ञान ब्रीडर्सना उद्ध्वस्त करेल. हे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने चित्र काढण्यासारखे आहे, जिथे मूळ कलाकाराचे महत्त्वच संपून जाते. एकीकडे विरोध होत असताना दुसरीकडे 70 च्या दशकापासून ब्रीडर्सचे काम करणारे एडुआर्डो रामोस म्हणतात की, पूर्वी भ्रूण प्रत्यारोपण आणि क्लोनिंगलाही असाच विरोध झाला होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान पुढे जातच राहणार, त्याला कोणी रोखू शकणार नाही. सध्या ही पाचही घोडी लहान असून, त्यांना पोलोच्या मैदानावर उतरण्यासाठी अजून काही वर्षे लागतील; मात्र कंपनीने पोलो असोसिएशनचा विरोध पाहता या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापराची योजना तूर्तास थांबवली आहे. हे ‘सुपर हॉर्स’ खरोखरच श्रेष्ठ ठरतील का, हे तर येणारा काळच ठरवेल.