

एडिनबर्ग (स्कॉटलंड) : एडिनबर्ग विद्यापीठाच्या रोस्लिन इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक यश मिळवले आहे. जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून क्लासिकल स्वाईन फीव्हर (सीएसएफ) या प्राणघातक विषाणूजन्य रोगाला पूर्णपणे प्रतिरोधक (रेसिस्टंट) असणारी डुकरे (वराह) या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहेत. जागतिक स्तरावर डुक्कर अर्थात वराह पालनासाठी आणि पशुधनाच्या आरोग्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे.
विषाणूची जीवनरेखा खंडित करण्यासाठी संशोधकांनी डुकरांच्या पेशींमधील डीएनएजेसी 14 नावाचे प्रथिन तयार करणार्या जनुकात (जीन) अचूक बदल केला. हे प्रथिन विषाणूला डुक्करांच्या पेशींमध्ये स्वतःच्या अनेक प्रती (पेस्टीव्हायरस) बनवण्यासाठी अत्यावश्यक असते. या जनुकीय बदलामुळे विषाणूला पेशीमध्ये पुनरुत्पादन करता आले नाही. विषाणूच्या संपर्कात आणलेली जीन-एडिटेड डुकरे पूर्णपणे निरोगी राहिली, तर जनुकीय बदल न झालेल्या डुकरांमध्ये रोगाची लक्षणे आढळली.
क्लासिकल स्वाईन फीव्हर (सीएसएफ) हा रोग जगातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक करतो, ज्यामुळे पशुधनावर परिणाम होतो. शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. शास्त्रज्ञांच्या या शोधामुळे आता सीएसएफ या रोगाच्या नियंत्रणासाठी एक अचूक आणि प्रभावी मार्ग तयार झाला आहे. ज्या पेस्टीव्हायरस कुटुंबातील आहे, त्याच कुटुंबातील विषाणू गायी आणि मेंढ्यांनाही संक्रमित करतात. शास्त्रज्ञांच्या मते, हेच जनुकीय संपादन तंत्रज्ञान (जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी) मेंढ्या आणि गुरांमध्येही संबंधित विषाणूजन्य रोगांपासून संरक्षण देण्यासाठी वापरले जाऊ शकते. रोस्लिन इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. सायमन लिलिको यांच्या मते, जीन एडिटिंग हे लसीकरण आणि जैवसुरक्षा उपायांसह पशुधनाच्या रोग नियंत्रणाच्या व्यापक धोरणाचा भाग बनू शकते. या संशोधनामुळे पशुधन आरोग्य सुधारण्यास आणि शाश्वत शेतीला बळ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.