

कॅलिफोर्निया : टेक दिग्गज गुगलने आपल्या प्रसिद्ध गूगल अर्थ प्लॅटफॉर्मला आता अधिक ‘स्मार्ट’ बनवले आहे. कंपनीने यामध्ये आपले नवीनतम जेमिनी एआय मॉडेल्स समाविष्ट केले आहेत, जे आता जगभरातील पूर, दुष्काळ, वणवे आणि इतर नैसर्गिक आपत्तींची स्थिती समजून घेण्यास आणि त्यावर मात करण्यास मदत करतील.
गुगलचे हे नवे पाऊल त्याच्या ‘अर्थ एआय प्लॅटफॉर्म’ला एका नवीन स्तरावर घेऊन जाते, जिथे जिओस्पेशियल एआयच्या (भौगोलिक कृत्रिम बुद्धिमत्ता) मदतीने ते जगभरातील सरकारे आणि संस्थांना आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण देखरेखीमध्ये मदत करेल. गुगलच्या म्हणण्यानुसार, त्याची पूर अंदाज प्रणाली आता जगातील सुमारे दोन अब्जांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे. वर्ल्ड व्हिजनसारख्या संस्था गरजूंना अन्न आणि स्वच्छ पाणी वितरणाची योजना चांगल्या प्रकारे आखू शकत आहेत.
कंपनीने सांगितले की, 2025 मध्ये कॅलिफोर्नियातील वणव्यादरम्यान, गुगल मॅप्स आणि क्रायसिस अलर्टस्ने 1.5 कोटी लोकांना वेळेवर सुरक्षित आश्रयस्थानांपर्यंत पोहोचण्यास मदत केली होती. गुगलचे नवे वैशिष्ट्य ‘जिओस्पेशियल रीजनिंग’ आता हवामान, लोकसंख्या आणि उपग्रह छायाचित्रे यांसारख्या विविध डेटा स्रोतांना जोडून एक व्यापक विश्लेषण तयार करेल. यामुळे संस्थांना हे जाणून घेणे सोपे होईल की, वादळ किंवा पुरामुळे कोणते भाग सर्वात जास्त प्रभावित होतील आणि कोणत्या भागात मदत कार्य प्रथम सुरू करावे लागेल. उदाहरणार्थ, GiveDirectly सारख्या संस्था आता पूर आणि लोकसंख्या डेटा एकत्र करून, कोणत्या भागांना सर्वात जलद मदतीची गरज आहे हे निश्चित करू शकतात. गुगलने अशा संस्थांना विश्वसनीय परीक्षक बनण्यासाठी आमंत्रित केले आहे, जेणेकरून ते या तंत्रज्ञानाचा सुरुवातीला उपयोग करू शकतील. गुगल आता आपली अर्थ एआय साधने थेट गूगल अर्थमध्येच समाविष्ट करत आहे. यामुळे वापरकर्ते उपग्रह प्रतिमा पाहून त्वरित विश्लेषण करू शकतील की, कुठे पाण्याची कमतरता वाढत आहे, कुठे वणव्याचा धोका आहे किंवा कोणते जलाशय कोरडे पडत आहेत.