

चेन्नई : आपण सर्वजण गणपती बाप्पाच्या गजमुख (हत्तीच्या तोंडाच्या) रूपाची पूजा करतो; पण तुम्हाला माहीत आहे का, भारतात असे एक मंदिर आहे, जिथे गणपतीची पूजा मानवी मुख असलेल्या रूपात केली जाते? सामान्यतः, भारतात गणपतीच्या मानवी रूपाची पूजा केलेली दिसत नाही; पण तामिळनाडूमध्ये असे एक मंदिर आहे, जिथे गणपतीच्या मानवी रूपाची पूजा केली जाते. या मंदिराला आदी विनायक मंदिर असेही म्हणतात. याठिकाणी असलेली मूर्ती गणपतीची आहे, असे म्हटल्यावर अनेकांना ते पटणारही नाही! याचे कारण म्हणजे आपल्याला गजमुख गणेश पाहण्याचीच सवय आहे. मात्र, इथे गणेशाला गजमुख लावण्यापूर्वीचे रूप दिसते.
आदी विनायक मंदिराची खासियत ही आहे की, येथे बाप्पाच्या अशा रूपाची पूजा केली जाते, जी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कुठेही होत नाही. हे केवळ भारताचेच नाही, तर संपूर्ण जगातील असे एकमेव मंदिर आहे, जिथे गणपती बाप्पाची मानवी मुख असलेल्या रूपातील मूर्ती आहे. येथे गणपतीच्या शरीरावर हत्तीचे तोंड नसून मानवी तोंड आहे. आदी विनायक मंदिर तामिळनाडू राज्यातील तिरुवरूर जिल्ह्यामध्ये कुटनूरपासून सुमारे 3 कि.मी. दूर तिलतर्पण पुरी येथे आहे.
अशी मान्यता आहे की, जेव्हा भगवान शिवाने रागाच्या भरात गणपतीचे शीर कापले होते, तेव्हा त्यांनी स्वतःच हत्तीचे शीर लावून त्यांना जीवनदान दिले होते; पण या मंदिरात त्यांच्या मूळ मानवी मुख असलेल्या रूपात पूजा केली जाते, जे माता पार्वतीने आपल्या हातांनी बनवले होते. या मंदिराचे नाव आदी विनायक ठेवण्यामागे कारण असे आहे की, येथे त्यांच्या मूळ, म्हणजेच आदी रूपाची पूजा होते. लोकांचा असा विश्वास आहे की, सुरुवातीला गणपती असेच दिसत होते, जे त्यांचे मूळ रूप होते. आदी विनायक मंदिराला भगवान श्रीरामाशीदेखील जोडले जाते. कारण, श्रीराम येथे आले होते. असे मानले जाते की, महादेवाने त्यांना आदी विनायक मंदिरात जाऊन पूजा आणि पिंडदान करण्यास सांगितले होते. जेव्हा श्रीरामाने आदी विनायक मंदिरात पिंडदान केले, तेव्हा सर्व पिंड शिवलिंगात बदलले. याच कारणामुळे, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी देशाच्या कानाकोपर्यातून लोक येथे येतात.