

नवी दिल्ली : पुण्यसलिला गंगा नदीचे भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महात्म्य आहे. गंगाजल पवित्र असते अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे. मात्र, हा केवळ आस्थेचाच विषय आहे असे नाही. अनेक मुघल बादशाह केवळ शुद्ध गंगाजल प्राशन करीत असत, तसेच अनेक इंग्रज जहाजातून मायदेशाच्या दीर्घप्रवासासाठी निघाले की प्रवासात चांगल्या स्थितीत राहू शकणारे पाणी म्हणून गंगाजल सोबत घेऊन जात. गंगेचे पाणी शुद्ध का राहते याबाबत काही संशोधनेही झालेली आहेत. आता नागपूरच्या संशोधकांनी त्याचा शोध घेतला आहे. देशातील नामांकित ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था’ म्हणजेच ‘निरी’च्या वैज्ञानिकांनी हे रहस्य उलगडले आहे. गंगाजलामध्ये स्वत:ला स्वच्छ करून घेण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. गंगेच्या पाण्यात ‘बॅक्टीरियोफेज’ची प्रचुर मात्रा असते, जे गंगेचं पाणी दूषित होण्यापासून बचाव करते.
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ गंगा मिशन’ अंतर्गत निरीचे संशोधक डॉक्टर कृष्णा खैरनार यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आलं. या संशोधनासाठी गंगेला तीन टप्प्यात विभागण्यात आले. 1) गोमुख ते हरिद्वार, 2) हरिद्वार ते पाटणा, 3) पाटणा ते गंगासागर. वैज्ञानिकांनी यासाठी 50 विविध ठिकाणचे गंगाजल आणि नदीखालची वाळू आणि मातीचे नमुने घेतले. गंगा नदीत सेल्फ प्युरिफाइडचे तत्त्व असतात, असं आम्हाला आढळून आलं, असे डॉ. खैरनार यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या वेळच्या कुंभच्या कालावधीतीलही नमुने वैज्ञानिकांनी गोळा केले होते. पाण्यातील किटाणू नष्ट करणारे बॅक्टेरियाफेज हे गंगाजलमध्ये आम्हाला आढळले. यासोबतच गंगाजलामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मात्रादेखील असल्याचे संशोधनात समोर आले. गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनची पातळी 20 मिलिग्राम प्रति लिटरपर्यंत आढळली. त्यासोबतच टरपीन नावाचे फायटोकेमिकलही सापडले. या तीन तत्त्वांमुळे गंगेचे पाणी निर्मळ राहते. ते कधीच खराब होत नाही, असं खैरनार म्हणाले. ही तत्त्व केवळ गंगा नदीतच आहेत की, इतर नद्यांमध्ये याचाही शोध वैज्ञानिकांनी घेतला. यासाठी यमुना आणि नर्मदा नदीतील पाण्यावर रिसर्च करण्यात आले. मात्र, गंगेच्या पाण्यात असलेलं तत्त्व अन्य नद्यांच्या पाण्यात अतिशय कमी मात्रेत असल्याचं समोर आलं. सध्या प्रयागराज येथे महाकुंभ सुरू असून, लाखो भाविक गंगेत स्नान करतात. मात्र, स्नान करण्याच्या पाच किलोमीटरपासून गंगेचे पाणी हे निर्मळ होतं. स्वतःला स्वच्छ करून घेण्याचा गुणधर्म गंगा नदीत आहे. त्यामुळेच हे पाणी स्वच्छ राहतं.