Ganesh Puja | 190 टन वजनाची एकाच पाषाणातील सुबक गणेशमूर्ती

कोईम्बतूरचे ‘मुंधी विनायक’ मंदिर
Ganesh Puja
Ganesh Puja | 190 टन वजनाची एकाच पाषाणातील सुबक गणेशमूर्ती
Published on
Updated on

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर केवळ उद्योगांसाठीच नव्हे, तर एका भव्य आणि अद्वितीय गणेश मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. पुलियाकुलम परिसरात असलेले ‘मुंधी विनायक मंदिर’ हे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर ते शिल्पकलेचा एक अद् भुत नमुना आहे. येथे तब्बल 20 फूट उंच आणि 190 टन वजनाची गणेशाची भव्य मूर्ती एकाच दगडातून साकारण्यात आली आहे, जी आशियातील सर्वात मोठ्या गणेशमूर्तींपैकी एक मानली जाते.

या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील गणेशाची भव्य मूर्ती. ‘मुंधी विनायक’ या नावाचा अर्थ ‘प्रथम पूजनीय’ किंवा ‘अग्रगण्य’ असा होतो आणि ही मूर्ती आपल्या नावाला सार्थ ठरवते. या मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये आहेत : एकपाषाणी मूर्ती : ही संपूर्ण मूर्ती एकाच विशाल दगडातून कोरण्यात आली आहे, ज्यामुळे तिचे कलात्मक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढते. उंची आणि वजन : मूर्तीची उंची सुमारे 19 फूट 10 इंच (जवळपास 20 फूट) असून, वजन तब्बल 190 टन आहे. स्थापना : या मूर्तीची स्थापना 1982 साली करण्यात आली.

यासाठी लागणारा विशाल दगड इरोडजवळील ऊथुकुली नावाच्या गावातून आणण्यात आला होता. मुंधी विनायक मंदिर हे स्थानिक भाविकांसोबतच देशभरातील पर्यटकांसाठीही एक प्रमुख आकर्षण ठरले आहे. मंदिराची रचना साधी असली, तरी प्रवेश करताच समोर दिसणारी गणेशाची भव्य मूर्ती प्रत्येकाला थक्क करते. येथे येणारे भाविक आपल्या मार्गातील अडथळे दूर व्हावेत आणि कार्यात यश मिळावे, यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करतात. विशेषतः, गणेश चतुर्थीच्या काळात या मंदिराचे वैभव पाहण्यासारखे असते.

यावेळी मूर्तीला विशेष सजावट केली जाते, महापूजा आणि अभिषेक आयोजित केले जातात. हजारो भाविक या उत्सवात सहभागी होण्यासाठी मंदिरात गर्दी करतात. हे मंदिर केवळ एक धार्मिकस्थळ नसून, ते मानवी श्रद्धा आणि कलेचा एक विलक्षण संगम आहे. 190 टन वजनाचा दगड एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी आणणे आणि त्यानंतर त्यावर इतकी सुबक आणि भव्य मूर्ती कोरणे हे एक मोठे आव्हान होते. तत्कालीन कारागिरांनी आपल्या कौशल्याने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. मूर्तीचे प्रत्येक अंग, सोंडेवरील नक्षीकाम आणि चेहर्‍यावरील भाव अत्यंत कुशलतेने कोरलेले दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news