

नवी दिल्ली : सध्या फूड एक्सपेरिमेंटचा ट्रेंड चांगलाच वाढताना दिसत आहे. स्ट्रीट फूड विक्रेते आणि ढाबा चालक नवनवीन फ्यूजन डिश तयार करून लोकांना आश्चर्यचकित करत आहेत. प्रत्येक जण स्वतःला शेफ समजून काहीतरी नवीन पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. कधी हे प्रयोग एवढे चविष्ट होतात की लोक प्रभावित होतात, तर कधी इतके विचित्र असतात की पाहणारे दंग राहतात. सध्या असाच एक अनोखा सँडविच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हे सँडविच चक्क गाजराच्या हलव्याचे आहे!
गाजर हलवा हा हिवाळ्यात खूप लोकप्रिय असतो आणि घराघरांत आवर्जून तयार केला जातो. विशेषतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात गाजर मुबलक प्रमाणात मिळत असल्याने या काळात हलवा बनवणे अगदीच सामान्य बाब असते. मात्र, काही लोक यातही वेगवेगळे फ्यूजन करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक अनोखा प्रयोग अलीकडेच समोर आला आहे, ज्यामध्ये एका स्ट्रीट वेंडरने गाजर हलव्याचा सँडविच तयार केला आहे. या अनोख्या सँडविचचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती 50 रुपयांचा गाजर हलवा खरेदी करतो आणि तो सँडविचवाल्याकडे घेऊन जातो. स्ट्रीट वेंडर त्या हलव्याला ब्रेडवर लावतो आणि दुसर्या बाजूला बटर लावतो. त्यानंतर तो पारंपरिक पद्धतीने तव्यावर सँडविच तळतो. सँडविच तयार झाल्यावर तो त्याचे चार तुकडे करून त्यावर क्रीम आणि बटर घालून ग्राहकाला देतो. हे अनोखे सँडविच पाहून लोक चकित झाले आहेत. काहींनी या प्रयोगाची प्रशंसा केली, तर काहींनी त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.