Gaganyaan Mission | गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांचे रशियात ‘झीरो ग्रॅव्हिटी’ प्रशिक्षण

चौघेही हवेत तरंगताना दिसले, मजेशीर व्हिडीओ समोर
Gaganyaan Mission |
Gaganyaan Mission | गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांचे रशियात ‘झीरो ग्रॅव्हिटी’ प्रशिक्षण
Published on: 
Updated on: 

मॉस्को : भारताच्या महत्त्वाकांक्षी 'गगनयान' मोहिमेतील अंतराळवीर सध्या आपल्या अंतराळ प्रवासासाठी प्रशिक्षण घेत आहेत. चौघेही अंतराळवीर या मानवी अंतराळ उड्डाणाची तयारी रशियामध्ये करत असून, तेथील प्रशिक्षणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चौघेही 'झिरो ग्रॅव्हिटी' (अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण) अवस्थेत राहण्याचा अनुभव घेताना दिसत आहेत. अंतराळात गुरुत्वाकर्षणाशिवाय म्हणजेच वस्तूंना पृथ्वीकडे खेचून धरणाऱ्या आणि त्यांना जमिनीवर टिकवून ठेवणाऱ्या बलाशिवाय राहावे लागते, जो एक नवा आणि बराच आव्हानात्मक अनुभव असतो; त्यामुळे हा टप्पा या प्रशिक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो.

रशियाच्या 'Il-76MDK' पॅराबोलिक विमानातील या प्रशिक्षणादरम्यान भारतीय अंतराळवीरांनी खास तयार केलेल्या उड्डाण मार्गांद्वारे कमी गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीचा अनुभव घेतला. विमानाने वेगाने वर चढणे आणि खाली झेप घेणे अशी प्रक्रिया अवलंबल्यामुळे काही काळासाठी गुरुत्वाकर्षणात बदल जाणवला. त्यातून अंतराळवीरांना इतर खगोलीय पिंडांवरील परिस्थितीसारखा अनुभव मिळाला. या सरावादरम्यान चंद्रावरील गुरुत्वाकर्षण (जे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या १८ टक्के असते) आणि मंगळ ग्रहावरील गुरुत्वाकर्षण (जे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या ३८ टक्के असते) यांसारख्या स्थितींची निर्मिती करण्यात आली होती.

विमान खास आखलेल्या मार्गावरून उड्डाण करत असताना या प्रशिक्षणाच्या व्हिडीओमध्ये अंतराळवीर विमानाच्या आत कोलांट्या उड्या मारताना आणि हवेत तरंगताना दिसतात. पृथ्वीच्या तुलनेत गुरुत्वाकर्षण बल अत्यंत कमी असताना आपले शरीर कशा प्रकारे कार्य करते, हे समजून घेण्यास या अनुभवामुळे अंतराळवीरांना मदत होते. अंतराळवीरांच्या प्रशिक्षणात 'झिरो ग्रॅव्हिटी' (शून्य गुरुत्वाकर्षण)चा नेहमी उल्लेख केला जातो; मात्र कमी गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीचे सिम्युलेशन (प्रतिकृती) इतर ग्रहांच्या पृष्ठभागावर चालण्या-फिरण्याचा अनुभव समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते.

या भारतीय पथकात विंग कमांडर शुभांशु शुक्ला, ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि विंग कमांडर अंगद प्रताप यांचा समावेश आहे. हे चौघेही भारतीय हवाई दलाचे अत्यंत प्रशिक्षित चाचणी वैमानिक (टेस्ट पायलट) राहिले आहेत. कठीण उड्डाण मोहिमांचा व्यापक अनुभव असलेल्या या अधिकाऱ्यांची निवड 'इस्रो'ने (ISRO) केली आहे. या चार अंतराळवीर उमेदवारांच्या प्रशिक्षणात रशियातील 'गॅगरिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर'मधील प्रशिक्षण आणि बंगळूर येथील 'इस्रो'च्या केंद्रांमध्ये मोहिमेशी संबंधित विशेष तयारीचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.