

टोकियो ः सध्या तंत्रज्ञान ‘दिन दुनी रात चौगुनी’ अशा वेगाने प्रगती करीत आहे. रोबोट्सचाच विचार केला तर सध्या हरेक प्रकारचे रोबोट निर्माण होत आहेत. संशोधकांनी म्हटले आहे की, भविष्यातील रोबोट तर केवळ स्पर्शानेच तुमची काय भावना आहे, तुम्हाला काय वाटत आहे, हे सांगू शकतील. त्वचेचा स्पर्श व तुमच्या घामाच्या विश्लेषणातूनच सध्या तुमच्या मनात कोणत्या भावना आहेत, हे रोबोट्सना समजू शकेल. एखाद्याच्या भावनांचा छडा लावण्यासाठीही हा एक प्रभावी उपाय असल्याचे संशोधकांना वाटते. ही ‘स्किन कंडक्टन्स’ नावाची घटना शरीराला घाम आल्यावर बदलत असते. एखाद्याच्या भावनेचा अचूक छडा लावण्यासाठी ही एक आश्चर्यकारकरीत्या अचूक पद्धत ठरू शकते.
एका नव्या संशोधनात संशोधकांनी ही ‘स्किन कंडक्टन्स’ची पद्धत वापरली. काही भावुक करणारे व्हिडीओ दाखवल्यानंतर 33 सहभागी लोकांच्या भावनांचा छडा लावण्यासाठी तिचा वापर करण्यात आला. ‘स्किन कंडक्टन्स’ हे एक असे मोजमाप आहे जे त्वचा किती चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते यावर आधारित आहे. ज्यावेळी आपल्याला घाम येतो, त्यावेळी स्किन कंडक्टन्स बदलते. संशोधकांना अशा मोजमापांमध्ये तसेच भय, आश्चर्य, कौटुंबिक प्रेम अशा भावनांशी संबंधित व्हिडीओ पाहण्यामध्ये परस्परसंबंध असल्याचे दिसून आले. त्यामुळे रिअल टाईममध्येच भावनांचा अचूक छडा लावण्यासाठी हे एक प्रभावी साधन असल्याचे दिसून आले. ज्यावेळी या पद्धतीचा वापर अन्य फिजिओलॉजिकल सिग्नल्स म्हणजेच हृदयाच्या ठोक्यांचे निरीक्षण, मेंदूतील हालचाली यांच्यासह केला त्यावेळी स्किन कंडक्टन्स ही पद्धत भावनांबाबत संवेदनशील असलेली उपकरणे किंवा सेवांमध्ये केंद्रीय भूमिका बजावू शकते हे दिसून आले. भविष्यातील रोबोंमध्ये ही क्षमता असेल व ते केवळ स्पर्शाने किंवा घामाच्या विश्लेषणातून एखाद्याच्या मनात त्यावेळी कोणती भावना आहे, हे ओळखू शकेल. टोकियो मेट्रोपोलिटन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.