

पॅरिस : बोटींचा वेग वाढवण्याच्या इच्छेतून जन्मलेले हायड्रोफॉयल तंत्रज्ञान आज जलवाहतुकीला अधिक स्वच्छ रूप देण्यासाठी पुनरुज्जीवित होत आहे. हे तंत्रज्ञान बोटींना लाटांवरून वर उचलण्यास मदत करते.
1860 च्या दशकात फ्रान्समध्ये एक विचित्र दृश्य दिसले असेल, एक वल्हवणारी बोट पाण्यावर उंच तरंगताना दिसत होती, ज्यामध्ये खाली लावलेले काही आकारांचे भाग तिला वर उचलण्यास मदत करत होते. 1869 मध्ये पॅरिसचे शोधक इमॅन्युएल डेनिस फारकॉट यांनी या प्रकारच्या जहाजाचे पहिले पेटंट दाखल केले होते. ही हायड्रोफॉयल बोट प्रत्यक्षात बांधली गेली की नाही हे माहीत नाही; पण पुढील 50 वर्षांत इतरांनी बोटीला पाण्यावर ‘उडवण्यात‘ यश मिळवले, हे निश्चित आहे. इटालियन शोधक एनिको फोरलानिनी यांनी 1906 मध्ये इटालियन आल्प्समधील लेक मॅगिओरवर एक कार्यरत हायड्रोफॉयल बोट यशस्वीरीत्या तरंगवली.
टेलिफोनचे शोधक स्कॉटिश अलेक्झांडर ग््रॉहम बेल यांनीही सुरुवातीचे विमान डिझाईन करण्याच्या प्रयत्नात अनेक हायड्रोफॉयल तंत्रज्ञान विकसित केले. बेलच्या चौथ्या हायड्रोफॉयल जहाजाने, ज्याला कऊ-4 म्हणून ओळखले जाते, 70 मैल प्रति तास (113 किमी/तास) पेक्षा अधिक वेग गाठला. याने जलवाहनांसाठी जागतिक वेगाचा विक्रम मोडला आणि तो विक्रम त्यांनी एक दशक टिकवून ठेवला. स्वीडनच्या घढक रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील नेव्हल आर्किटेक्चरचे प्राध्यापक जैकब कुटेनकेउलर म्हणतात, ‘1900 च्या दशकाच्या सुरुवातीला, लोक हायड्रोफॉयलसह प्रयोग करत होते आणि त्यामुळे जहाजांना जास्त वेग, कमी ड्रॅग (पाण्याचा कमी अडथळा) यांसारखी मनोरंजक वैशिष्ट्ये मिळाली. ‘1960 च्या दशकात हायड्रोफॉयलमध्ये स्वारस्य वाढले.
कारण, लोकांना जास्त वेगाने प्रवास करायचा होता. आता, हायड्रोफॉयलचा पुन्हा उदय होत आहे. यावेळी, फेरी सारख्या लहान बोटींमधून होणारे उत्सर्जन कमी करण्याच्या क्षमतेमुळे. कुटेनकेउलर म्हणतात, ‘आज हायड्रोफॉयलकडे वळण्याचे मुख्य कारण म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन.’ सुरुवातीचे हायड्रोफॉयल जीवाश्म इंधनावर चालत होते आणि त्यांचे शरीर जड धातूचे होते. त्यांच्या व्ही-आकाराच्या फॉइलमुळे ते पारंपरिक बोटींपेक्षा खूप वेगाने जात होते; पण तरीही बराच ‘ड्रॅग’ (पाण्याचा विरोध) निर्माण होत होता. 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत, उपलब्ध साहित्य, ऊर्जा स्रोत आणि तंत्रज्ञान यामुळे हायड्रोफॉयल तंत्रज्ञान ठप्प झाले होते; पण कुटेनकेउलर यांच्या मते, नवीन तांत्रिक प्रगतीमुळे हायड्रोफॉयलने आधुनिक पुनरागमन केले आहे. यात लहान, अधिक कार्यक्षम बॅटरी, हलके बांधकाम साहित्य आणि मायक्रो कॉम्प्युटर यांचा समावेश आहे. हे मायक्रो कॉम्प्युटर सेन्सर्स चालवतात, जे हायड्रोफॉयलला आपोआप संतुलित करतात. यामुळे जुन्या व्ही-आकाराच्या फॉइलऐवजी आता सुव्यवस्थित सिंगल फॉइल वापरले जातात, जे बोटीला पूर्णपणे हवेत उचलतात.