

आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारात अनेक भाज्या आणि फळांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण यामुळे आपल्या शरीराला योग्य पोषण तत्त्वे मिळतात. काही फळे ही पचनसंस्था आणि हाडांच्या आरोग्यासाठीही गुणकारी ठरतात. त्याबाबतची ही माहिती...
सफरचंद : 100 ग्रॅम सफरचंदात एकूण 2.4 ग्रॅम फायबर असतात. याव्यतिरिक्त त्यात 6 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. सफरचंद हे मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फ्लोराईड, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झियाझॅन्थिन यांचेही स्रोत आहेत.
नाशपाती : या फळात फायबर भरपूर असते. फायबरच्या बाबतीत नाशपाती हे एक उत्तम फळ आहे. हे फळ बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते 100 ग्रॅम नाशपातीमध्ये 3.1 ग्रॅम फायबर आणि 9 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. तसेच ते लोह, तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचा देखील एक चांगला स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन सी सुद्धा चांगल्या प्रमाणात आढळते.
पॅशन फू्रट : पॅशन फू्रट ज्याला कृष्णा फळ असेही म्हणतात, यामध्ये फायबरचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात सफरचंदापेक्षा कित्येक पटींनी जास्त फायबर असते. 100 ग्रॅम पॅशन फू्रटमधून 10.4 ग्रॅम फायबर आणि 12 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. त्यामुळे जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील किंवा तुमची हाडे मजबूत करायची असतील, तर तुमच्या आहारात पॅशन फू्रटचा समावेश करा.
पेरू : पेरू हे फळ सुद्धा फायबरने भरपूर भरले आहे. 100 ग्रॅम सफरचंदात 2.4 ग्रॅम फायबर असते, तर 100 ग्रॅम पेरूमध्ये 5.4 ग्रॅम फायबर आणि 18 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. इतकेच नाही, तर पेरूमध्ये व्हिटॅमिन सी संत्र्यापेक्षाही जास्त प्रमाणात असते.
किवी : किवी फळ आता बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जाते; परंतु भारतात बहुतेक लोक ते फक्त ताप आल्यावरच खातात. तुम्ही हे फळ दररोज खाऊ शकता कारण त्यात अनेक पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात असतात. 100 ग्रॅम किवीमध्ये 3 ग्रॅम फायबर, 34 मिलिग्रॅम कॅल्शियम, 17 मिलिग्रॅम मॅग्नेशियम, 34 मिलिग्रॅम फॉस्फरस, 312 मिलिग्रॅम पोटॅशियम आणि 92.7 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते.
केळी : पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात केळ्यांचा समावेश करण्याची शिफारस केली जाते. खरे तर पचनासाठी हे एक उत्तम फळ आहे. 100 ग्रॅम केळामध्ये अनेक पोषक घटक असतात, ज्यात 1.9 ग्रॅम प्रथिने, 2.6 ग्रॅम फायबर, 5 मिलिग्रॅम कॅल्शियम, 27 मिलिग्रॅम मॅग्नेशियम, 358 मिलिग्रॅम पोटॅशियम आणि 22 मिलिग्रॅम फॉस्फरस यांचा समावेश होतो.