

न्यूयॉर्क : डायनासोर प्रामुख्याने मांसाहारी किंवा वनस्पती खाणारे होते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वीच्या एका लहान आकाराच्या डायनासोरचे जीवाश्म या समजुतीला नवे वळण देणारे ठरले आहेत. टर्की पक्ष्याएवढ्या आकाराचा, दात नसलेला आणि पोपटासारखी चोच असलेला हा डायनासोर प्रामुख्याने फळे आणि मऊ वनस्पती खात असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. फळे खाण्यासाठी विशेष अनुकूल शारीरिक रचना असलेला हा पहिला ज्ञात डायनासोर आहे.
‘इन्फर्नोगॅलस जेम्सी’ असे या प्रजातीचे नाव असून, त्याचा अर्थ ‘नरकातील कोंबडी’ असा होतो. पक्ष्यासारखा दिसणारा त्याचा आकार आणि अमेरिकेतील ‘हेल क्रीक’ या जीवाश्मसमृद्ध भूस्तरात सापडलेले अवशेष, यावरून हे नाव देण्यात आले आहे. या भूस्तराचा विस्तार मॉन्टाना, नॉर्थ डकोटा, साउथ डकोटा आणि वायोमिंग या राज्यांमध्ये आहे. या प्रजातीचे जीवाश्म मॉन्टाना आणि नॉर्थ डकोटा येथे सापडले आहेत.
हा डायनासोर सुमारे दीड मीटर लांब आणि ११.३ किलो वजनाचा होता. त्याचे जीवाश्म एका जवळपास पूर्ण सांगाड्यासह जबडा आणि टाळूच्या वेगवेगळ्या हाडांच्या स्वरूपात मिळाले आहेत. जीवाश्मांमध्ये पिसांचे थेट पुरावे नसले, तरी जवळच्या प्रजातींच्या अवशेषांवरून त्याच्या शरीरावर पिसे असावीत, असा अंदाज आहे.
फळे चावण्यासाठी अनुकूल जबडा
स्टोनी ब्रुक विद्यापीठातील जीवाश्मशास्त्रज्ञ ग्रेग फन्स्टन यांच्या नेतृत्वाखालील संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. संशोधकांना या डायनासोरच्या कवटीत फळे खाण्यासाठी अनुकूल असलेली तीन वैशिष्ट्ये आढळली. जबड्याचे स्नायू अन्न पुढे-मागे चावण्यासाठी सक्षम होते. जबड्याच्या लवचिक सांध्यामुळे खालचा जबडा पुढे सरकू शकत होता. तसेच, चोचीवरील खाचा आणि उंचवट्यांमुळे मऊ फळे चिरडणे आणि कापणे शक्य होत होते.
फुलझाडांच्या प्रसाराशी संबंध?
क्रिटेशस कालखंडात फुलझाडांचा (अँजिओस्पर्म्स) प्रसार वाढत होता. या झाडांवर विविध प्रकारची फळे येत असत. इन्फर्नोगॅलसच्या आहारात बेरीसारखी लहान फळे तसेच आंबा, ऑलिव्ह, पीच आणि चेरी यांसारख्या फळांच्या प्रकारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. फळे खाणारे प्राणी त्यांच्या बिया दूरवर पसरवण्यास मदत करतात. त्यामुळे या डायनासोरनेही फुलझाडांच्या प्रसारात भूमिका बजावली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. मात्र, या संबंधाला ठोस पुष्टी देण्यासाठी आणखी पुरावे आवश्यक आहेत.