

स्टॉकहोम : हायड्रोजन सायनाईड हे रसायन मानवासाठी अत्यंत घातक आणि विषारी मानले जाते. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा समज होता की, अत्यंत कमी तापमानात गोठल्यानंतर हे रसायन पूर्णपणे निष्क्रिय होते. मात्र, एका नवीन संशोधनाने हा विचार बदलून टाकला आहे. गोठलेले हायड्रोजन सायनाईड पृथ्वीवरील जीवनाच्या सुरुवातीच्या ‘केमिस्ट्री’ला चालना देण्यासाठी कारणीभूत ठरू शकले असावे, असे या अभ्यासातून समोर आले आहे.
स्वीडनचे शास्त्रज्ञ मार्टिन राहम आणि त्यांच्या टीमने केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष ‘एसीएस सेंट्रल सायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधनानुसार, अतिशय थंड वातावरणातही हे रसायन सूक्ष्म स्तरावर सक्रिय राहते आणि जीवनाचा पाया रचण्यासाठी आवश्यक असलेले रासायनिक बदल घडवून आणते. हायड्रोजन सायनाईड हे केवळ पृथ्वीवरच नाही, तर धूमकेतू, ग््राह, चंद्र आणि आंतरतारकीय ढगांमध्येही आढळते. जेव्हा हे रसायन पाण्याशी प्रक्रिया करते, तेव्हा त्यातून अमिनो ॲसिड आणि न्यूक्लियोबेस सारखे घटक तयार होतात, जे जीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
संशोधनात असे आढळले की, हायड्रोजन सायनाईड गोठल्यावर सुईसारख्या लांब क्रिस्टल्सची (स्फटिक) रचना तयार करते. या क्रिस्टल्सच्या टोकांवर एक प्रकारचे शक्तिशाली इलेक्ट्रिक फील्ड (विद्युत क्षेत्र) तयार होते. हे फील्ड रसायनांसाठी ‘कॅटलिस्ट’ म्हणून काम करते. यामुळे अत्यंत कमी तापमानातही हायड्रोजन सायनाईडचे रूपांतर अधिक सक्रिय अशा ‘हायड्रोजन आइसोसायनाईड’मध्ये होऊ शकते.
संशोधकांच्या मते, शनीचा चंद्र टायटन सारख्या थंड ठिकाणी अशा प्रक्रिया घडत असण्याची दाट शक्यता आहे. तिथे हायड्रोजन सायनाईडचे थर साचलेले आहेत आणि सूर्यप्रकाश किंवा वैश्विक किरणांच्या मदतीने ही रासायनिक प्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकते. थंड प्रदेशात किंवा धूमकेतूंवर ‘हायड्रोजन आइसोसायनाईड’ इतक्या मोठ्या प्रमाणात कसे आढळते, याचे कोडे शास्त्रज्ञांना पडले होते. सामान्य वायूरूपात हे तयार होणे कठीण असते. मात्र, नवीन अभ्यासाने हे स्पष्ट केले आहे की, गोठलेल्या अवस्थेत या रसायनाच्या पृष्ठभागावर हे बदल सहज घडून येतात. यामुळे अवकाशातील जीवसृष्टीच्या केमिस्ट्रीचा प्रवास कसा झाला असेल, हे समजण्यास मोठी मदत होणार आहे.