Laughing Boy Arun | ट्रक क्लीनर ते इंटरनेट सेन्सेशन: ‘लाफिंग बॉय’ अरुण

Laughing Boy Arun |
Laughing Boy Arun | ट्रक क्लीनर ते इंटरनेट सेन्सेशन: ‘लाफिंग बॉय’ अरुण
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : सोशल मीडियावर मीम्स आणि मजेशीर व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी हा चेहरा नवीन नाही. कोणत्याही व्हिडीओमध्ये काही मजेदार प्रसंग आला किंवा कोणाची जबरदस्त कॉमेडी झाली की, अनेकदा शेवटी एका मुलाची खळखळून हसण्याची क्लिप येते. हातात चहाचा कप, चेहऱ्यावर बेफिकीरपणा आणि न थांबणारे हास्य. बस, हीच त्याची ओळख बनली आहे. या मुलाचे नाव अरुणकुमार असून तो तेलंगणाचा रहिवासी आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. आज लोक त्याला ‘लाफिंग बॉय’ म्हणून ओळखतात. ज्या हसण्याने त्याला इंटरनेटवर प्रसिद्धी मिळवून दिली, त्यामागे आयुष्यातील अनेक खडतर वर्षे लपलेली आहेत.

अरुणचे बालपण सोपे नव्हते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती आणि घर चालवण्यासाठी त्याला लहान वयातच काम करावे लागले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, चौथीच्या पुढे त्याचे शिक्षण सुटले. पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेत त्याने लहान वयातच कष्टाची कामे सुरू केली. याचदरम्यान अरुणची नेहरू नावाच्या एका ट्रकचालकाशी ओळख झाली. नेहरूने त्याला आपल्यासोबत ट्रकवर क्लीनरचे काम दिले. त्यानंतर दोघांचा एकत्र प्रवास सुरू झाला. ट्रकवरील मालाची देखभाल करणे, चालकाला मदत करणे आणि लांबच्या प्रवासात त्याच्यासोबत राहणे हा अरुणच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला. मात्र, दोघांमध्ये केवळ कामाचेच नाते नव्हते.

प्रवासात मनसोक्त गप्पा मारणे, थट्टा-मस्करी करणे आणि मोकळ्या वेळेत दोघांचे मोबाईलवरून इन्स्टाग्राम रील्स बनवणे सुरू होते. त्यावेळी कदाचित कोणालाही वाटले नसेल की या छोट्या-छोट्या व्हिडीओंपैकी एक व्हिडीओ अरुणचे आयुष्य बदलून टाकेल. एके दिवशी दोघे राष्ट्रीय महामार्गावरील एका चहाच्या टपरीवर थांबले होते. तिथे एका गोष्टीवरून अरुण अचानक मोठ्याने हसू लागला. त्याच्या हसण्यात कोणताही बनावटपणा नव्हता. सर्व चिंता विसरून एखादी व्यक्ती काही क्षणांसाठी मनसोक्त हसावी, अगदी तसाच तो हसत होता. नेहरू यांना अरुणचा हा अंदाज आवडला आणि त्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात त्याचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. इथूनच या कथेला नवे वळण मिळाले.

व्हिडीओमधील अरुणचे बेफिकीर हसणे लोकांना इतके आवडले की पाहता पाहता तो इंटरनेटवर लोकप्रिय झाला. यूजर्सनी त्याच्या हसण्याच्या क्लिपचा वापर मीम्स आणि मजेशीर व्हिडीओंमध्ये करण्यास सुरुवात केली. हळूहळू ही लहानशी क्लिप सोशल मीडियावर त्याची ओळख बनली. सोशल मीडियामुळे अरुणच्या आयुष्यात ओळख आणि कमाईचे नवे मार्ग खुले झाले. मात्र, त्याच्या कथेतील सर्वात सुंदर भाग केवळ व्हायरल होणे हा नाही. गरिबीमुळे ज्या शिक्षणाचा त्याला मधल्या काळात निरोप घ्यावा लागला होता, ते पूर्ण करण्याचा निर्णय त्याने पुन्हा घेतला. अरुणने नव्याने अभ्यास सुरू केला आणि यंदाच्या मार्च महिन्यात दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.