

न्यू जर्सी : आपण ज्या पृथ्वीवर राहतो, ती केवळ आपल्याला निवारा देत नाही, तर ती ऊर्जेचा एक प्रचंड स्त्रोतदेखील बनू शकते. अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्याच्या गतीचा वापर करून वीज निर्मिती करण्याचा एक यशस्वी प्रयोग केला आहे. या संशोधनामुळे विज्ञानाच्या जगात एक नवी खळबळ उडाली आहे.
प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ख्रिस्तोफर एफ. चाईबा यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. यात ‘नासा’च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या वैज्ञानिकांचाही सहभाग होता. हे संशोधन प्रसिद्ध विज्ञान नियतकालिक ‘फिजिकल रिव्ह्यू रिसर्च’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, पृथ्वीच्या गाभ्यात असलेल्या वितळलेल्या धातूमुळे पृथ्वीभोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार होते. जेव्हा पृथ्वी फिरते, तेव्हा हे चुंबकीय क्षेत्र अवकाशात साधारणपणे एकाच स्थितीत राहते.
मात्र, पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू या क्षेत्राच्या आत सतत फिरत असते. सिद्धांतानुसार, या हालचालीतून वीज निर्माण होऊ शकते. या प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी ‘मॅगनीज झिंक फेराईट’ या पदार्थाचा वापर करून एक फूट लांब पोकळ सिलिंडर तयार केला. हा पदार्थ चुंबकीय लहरींना मार्ग देतो; पण वीज सहजासहजी वाहू देत नाही. हा सिलिंडर 57 अंशांच्या कोनात उत्तर-दक्षिण दिशेला झुकवून ठेवण्यात आला. जशी पृथ्वी फिरत राहिली, तसे या उपकरणात अतिशय सूक्ष्म प्रमाणात का होईना, पण सतत व्होल्टेज (Microvolts)) निर्माण झाल्याचे दिसून आले. या प्रयोगाचा मूळ आधार ‘लॉरेंज फोर्स’ हा नियम आहे. जेव्हा एखादा वाहक पदार्थ चुंबकीय क्षेत्रातून प्रवास करतो, तेव्हा त्यातील इलेक्ट्रॉन्सवर दाब पडतो आणि वीज तयार होते. आतापर्यंत असे मानले जात होते की, ही वीज काही क्षणातच नष्ट होते; पण या नवीन रचनेमुळे ही वीज टिकवून ठेवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
सध्या या प्रयोगातून मिळालेली वीज अत्यंत कमी (नॅनोअँपिअरमध्ये) आहे. ही वीज घरातील उपकरणे चालवण्यासाठी पुरेशी नाही. तरीही शास्त्रज्ञांच्या मते हा एक क्रांतिकारी टप्पा आहे. हे संशोधन अजून प्राथमिक अवस्थेत असले, तरी भविष्यात हे तंत्रज्ञान विकसित झाल्यास असे सेन्सर्स किंवा उपकरणे बनवता येतील, ज्यांना कधीही बॅटरी बदलण्याची किंवा इंधनाची गरज भासणार नाही. अनेक छोटी उपकरणे जोडून जास्त व्होल्टेज मिळवण्याचा प्रयत्न आता शास्त्रज्ञ करणार आहेत.