Ancient pots: फ्रान्समध्ये सापडले 40,000 हून अधिक नाण्यांनी भरलेले प्राचीन माठ
पॅरिस : फ्रान्समधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका प्राचीन वस्तीमधील घराखालील खड्ड्यात पुरलेले रोमन सामाज्यातील हजारो नाण्यांनी भरलेले तीन प्राचीन साठवणुकीचे माठ सापडले आहेत. सुमारे 1,700 वर्षांपूर्वी हे माठ सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा ‘पिगी बँक’ म्हणून पुरले गेले असावेत.
ईशान्य फ्रान्समधील सेनन गावात नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्रिव्हेंटिव्ह आर्कियोलॉजिकल रिसर्च (INRAP) या संस्थेद्वारे चालवलेल्या उत्खननादरम्यान हे तीन मोठे माठ (ज्याला ‘अम्फोरा’ म्हणतात) उघडकीस आले. या तीन माठांमध्ये एकूण 40,000 हून अधिक रोमन नाणी असण्याची शक्यता आहे. पहिला साठा : या माठात अंदाजे 83 पौंड (38 किलोग््रॉम) वजनाची नाणी होती, जी ‘सुमारे 23,000 ते 24,000 नाण्यांशी जुळतात, अशी माहिती व्हिन्सेंट जेनेव्हीव्ह, जे INRAP मधील नाणीशास्त्रज्ञ आहेत आणि या साठ्यांचे विश्लेषण करत आहेत, त्यांनी दिली.
दुसरा साठा : दुसऱ्या माठाचे आणि नाण्यांचे वजन सुमारे 110 पौंड (50 किलो) होते आणि शोध लागला तेव्हा माठाचा गळा तुटलेला होता, तेथून मिळालेल्या 400 नाण्यांच्या आधारावर यात 18,000 ते 19,000 नाणी असू शकतात, असे जेनेव्हीव्ह यांनी सांगितले. तिसरा साठा : तिसरा माठ प्राचीन काळातच बाहेर काढण्यात आला होता, आणि तो माठ ठेवलेल्या खड्ड्यात केवळ तीन नाणी शिल्लक होती. या भागात यापूर्वीच सुमारे 30 नाण्यांचे साठे सापडले आहेत, त्यामुळे या शोधाचे खरे महत्त्व नाण्यांच्या संख्येमध्ये नसून, हे साठे ज्या ठिकाणी सापडले, त्या ठिकाणासंबंधी तपशीलवार माहिती मिळाली आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात वाटेल त्याप्रमाणे, असुरक्षिततेच्या काळात लपवलेला हा ‘खजिना’ आहेच हे निश्चित नाही, असे INRAP च्या निवेदनात म्हटले आहे.
नाण्यांवर असलेल्या तारखांच्या आधारावर, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हे माठ इ.स. 280 ते 310 च्या दरम्यान पुरले गेले असावेत. या साठ्यांमध्ये अशी नाणी आहेत, ज्यावर समाट व्हिक्टोरिनस, टेट्रिकस पहिला आणि त्याचा मुलगा टेट्रिकस दुसरा यांचे अर्धपुतळे आहेत. हे समाट गॉलिक सामाज्याचे होते. गॉलिक सामाज्याने 260 ते 274 पर्यंत उर्वरित रोमन सामाज्यापासून स्वतंत्रपणे गॉल आणि आसपासच्या प्रांतांवर राज्य केले होते, नंतर 274 मध्ये समाट ऑरेलियनने ते पुन्हा रोमन सामाज्यात विलीन केले.

