
लंडन : जगातील सर्वात मोठा विषारी सर्प म्हणजे किंग कोब्रा. अन्य साप खाणारा व घरटे बांधून अंडी घालणारा हा साप अनेक बाबतीत लोकांच्या तसेच संशोधकांच्याही कुतूहलाचा विषय असतो. गेल्या 188 वर्षांपासून किंग कोब्राची एकच प्रजाती असल्याचे समजले जात होते. मात्र, वास्तवात त्याच्या चार प्रजाती असल्याचे आता निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी किंग कोब्राला ‘ओफिओफेगस हन्नाह’ या एकाच प्रजातीचे समजले जात होते. मात्र, आता नव्या संशोधनात आढळले आहे की, वेगवेगळ्या भागातील या चार प्रजातींमधील किंग कोब्राच्या शारीरिक रचनेपासून ते जनुकीय संरचनेपर्यंत अनेक बाबतीत भेद आहेत. यापूर्वी 2021 मधील एका संशोधनातही म्हटले होते की, किंग कोब्रा सापांमध्ये जनुकीय भेद अस्तित्वात आहेत. या संशोधनाचा आधार घेऊनच हे नवे संशोधन करण्यात आले. संशोधकांनी काही म्युझियम स्पेसिमन्स म्हणजेच संग्रहालयात ठेवलेल्या किंग कोब्राचे काही नमुने घेऊन याबाबतचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांना अनेक शारीरिक भेद दिसून आले. त्यावरून त्यांनी आता चार नव्या प्रजाती ठरवल्या आहेत. त्यामध्ये नॉर्दन किंग कोब्रा (ओ.हन्नाह), सुंदा किंग कोब्रा (ओफिओफेगस बंगारस), वेस्टर्न घाट किंग कोब्रा (ओफिओफेगस कलिंगा ) व ल्युझन किंग कोब्रा (ओफिओफेगस सॅल्वाटना). याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनॉमी’च्या 16 ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कलिंगा फौंडेशनचे संस्थापक आणि कलिंगा सेंटर फॉर रेनफॉरेस्ट इकॉलॉजीचे संचालक गौरीशंकर पोगिरी यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, हे संशोधन म्हणजे इतिहास घडवण्यासारखीच बाब आहे. किंग कोब्रा हे आर्द्रतायुक्त पर्यावरणात राहतात. विशेषतः, खुली जंगले तसेच पाणथळ जागी असलेल्या घनदाट मँग्रोव्ह झुडपांच्या परिसरातही आढळतात. भारतात पश्चिम घाटासह अन्यही काही ठिकाणी तसेच दक्षिण चीनपासून संपूर्ण आग्नेय आशियात किंग कोब्रा आढळतो. वेगवेगळ्या भागातील किंग कोब्राच्या शरीराचा रंग, पॅटर्न व आकारात बदल असतो, असे दिसून आले. 2021 च्या अभ्यासावेळी किंग कोब्रांच्या डीएनएचे विश्लेषण करण्यात आले होते. त्यानुसार त्यांचे चार प्रमुख जनुकीय वंश असल्याचे आढळले. आता तेच चार वेगवेगळ्या प्रजाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. या अभ्यासासाठी 153 म्युझियम स्पेसिमन्सचा वापर करण्यात आला.
नॉर्दन किंग कोब्रा(ओ. हन्नाह) : हे पूर्व भारत, म्यानमार आणि इंडो-चायना परिसरातील हिमालयाच्या भागात आढळतात. पुढे थायलंडपर्यंतही त्यांची व्याप्ती आहे. या प्रजातीचे प्रौढ साप गडद काठाचे व पिवळ्या पट्ट्यांचे असतात.
सुंदा किंग कोब्रा (ओ. बंगारस) : हे मलाय पेनिन्सुलामध्ये तसेच ग्रेटर सुंदाच्या सुमात्रा, बोर्नियो व जावासारख्या बेटांवर आणि फिलिपाईन्समध्ये आढळतात. यापैकी बहुतांश किंग कोब्रा हे कोणतेही पट्टे नसलेले किंवा अतिशय अरुंद, फिकट पट्ट्यांचे व गडद काठाचे असतात.
वेस्टर्न घाट किंग कोब्रा (ओ. कलिंगा) : हे भारतातील पश्चिम घाटात आढळतात. त्यांचे ‘ओ.बंगारस’ पेक्षा वेगळेपण त्यांच्या फिकट बँड्सभोवती नसलेल्या गडद काठांमुळे ओळखता येते.
ल्युझन किंग कोब्रा (ओ. सॅल्वाटाना) : हे उत्तर फिलिपाईन्समधील ल्युझन बेटावर आढळतात. त्यांचे शरीर अतिशय कमानदार व फिकट रंगाचे असते. त्यांच्या शरीरावर अन्य प्रजातींसारखे गडद पट्टे किंवा काठ नसतात.