

सिमला : हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यातील गिरिपार भागातील शिल्ला गावात चार भावांनी एकाच दिवशी आणि एकाच मुहूर्तावर विवाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. चारही वर आपापल्या वधूंना घेऊन घरी परतल्यानंतर, एकाच अंगणात पारंपरिक रीतीरिवाजांनुसार चार नववधूंचे जंगी स्वागत करण्यात आले. हा विवाह सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
या विवाहाला आणखी एक विशेष बाब म्हणजे, चारही भावांची वरात एकाच घरातून वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आणि संध्याकाळी चारही वर आपापल्या वधूंना घेऊन आनंदाने घरी परतले. विशेष म्हणजे, या वर मंडळींचे कुटुंब संयुक्त (एकत्रित कुटुंब) असून, यात आधी एकूण ३८ सदस्य होते, जे आता वाढून ४२ झाले आहेत. शिल्ला गावातील प्रताप चौहान आणि त्यांच्या भावाच्या मुलांचे लग्न असे एकाच दिवशी थाटामाटात पार पडले. प्रताप सिंह यांचा मुलगा भवान सिंह याचा विवाह मटियाना येथील शिवानी हिच्याशी झाला, तर रवींद्र चौहान याने दुगाना येथील रवीना हिच्याशी सात फेरे घेतले.
याशिवाय, सुरेंद्र सिंह यांचा मुलगा विजय चौहान याने बालीकोटीच्या चाकरी गावातील प्रमिला हिच्याशी, तर अजय चौहान याने कोडगाच्या बिराखना गावातील सुनीता हिच्याशी लग्नगाठ बांधली. गिरिपार भागात आजही संयुक्त कुटुंब पद्धतीची परंपरा अनेक गावांमध्ये जपली जाते. येथील अनेक गावांत एकाच कुटुंबातील अनेक सदस्य एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहतात आणि कौटुंबिक मालमत्तेची कोणतीही विभागणी न करता मिळून-मिसळून जीवन जगतात. शिल्ला गावातील हे कुटुंब याच परंपरेचे उत्तम उदाहरण आहे. प्रताप आणि सुरेंद्र यांच्याशी संबंधित या कुटुंबात तब्बल दहा भाऊ एकाच छताखाली एकत्र राहतात आणि अद्याप त्यांच्या जमिनीची कोणतीही विभागणी झालेली नाही.