100 Million Year Old Fossil | दहा कोटी वर्षांपूर्वीच्या अन्नसाखळीचे दृश्य दाखवणारे जीवाश्म

100 Million Year Old Fossil | दहा कोटी वर्षांपूर्वीच्या अन्नसाखळीचे दृश्य दाखवणारे जीवाश्म
Reuben Trusler
Published on
Updated on

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागात सापडलेल्या एका ‘इथिओसॉर’ प्राण्याच्या जीवाश्मामुळे तब्बल १० कोटी वर्षांपूर्वीच्या अन्नसाखळीचे एक अत्यंत दुर्मीळ दृश्य समोर आले आहे. एका अभ्यासानुसार, महासागरातील महाकाय हिंस्त्र प्राण्याने हल्ला करण्यापूर्वी, या इथिओसॉरने उडणाऱ्या एका ‘टेरोसॉर’ला (Pterosaur) गिळले होते.

‘बॉब’ (BOB - Bag of Bones) असे टोपणनाव देण्यात आलेले हे जीवाश्म २० ते २३ फूट (६ ते ७ मीटर) लांब इथिओसॉरचे आहे. इथिओसॉर हे डॉल्फिनच्या आकाराचे सागरी सरिसृप होते, जे मेसोझोईक युगात (सुमारे २५ कोटी ते ९ कोटी वर्षांपूर्वी) डायनासोरच्या काळात अस्तित्वात होते. परंतु, ‘गोंडवाना रिसर्च’ या नियतकालिकात २८ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासात संशोधकांना या इथिओसॉरच्या पोटाच्या भागात उडणाऱ्या ‘टेरोसॉर’च्या जबड्याचे तुकडे, तसेच मासे आणि सेफॅलोपॉडचे (अष्टपादांसारखे प्राणी) अवशेष सापडले आहेत. इथिओसॉर हे उडणाऱ्या प्राण्यांची शिकार करायचे, याचा हा जगातील पहिला प्रत्यक्ष पुरावा ठरला आहे. हे जीवाश्म २०१९ मध्ये क्वीन्सलँडच्या दुर्गम भागात सापडले होते.

या जीवाश्मावरून इथिओसॉरच्या हिंसक अंताचे संकेतही मिळतात. त्याच्या सांगाड्यातील हाडे चक्काचूर झालेली आहेत, काही बरगड्या गायब आहेत आणि शरीरावर चिरडल्याच्या मोठ्या जखमा आहेत. संशोधकांच्या मते, या भयंकर जखमा ‘क्रोनोसॉर क्वीन्सलँडिकस’ (Kronosaurus queenslandicus) या प्राण्याने केल्या असाव्यात. क्रोनोसॉर हा १२ कोटी ते १० कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ‘इरोमंगा समुद्रात’ राहणारा आणि मगरीसारखा दिसणारा, त्या काळातील सर्वात मोठा आणि हिंस्त्र शिकारी प्राणी होता. पोटात पचत असलेल्या अन्नासह जीवाश्म सुरक्षित राहणे ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जाते, कारण अशा गोष्टी विशिष्ट नैसर्गिक परिस्थितींमध्येच सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे १० कोटी वर्षांपूर्वी घडलेली ही ‘ट्रिपल-लेव्हल’ अन्नसाखळीची घटना विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news