

लंडन : जीवाश्मशास्त्रज्ञांना स्कॉटलंडमधील ‘स्काई बेटावर’ एका नवीन प्रकारच्या सरपटणार्या प्राण्याचे जवळपास संपूर्ण जीवाश्म सापडले आहे. सुमारे 160 ते 167 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या (16 कोटी वर्षांपूर्वीच्या) जुरासिक कालखंडातील हा प्राणी सापसद़ृश्य आणि सरडासद़ृश्य वैशिष्ट्यांचे एक उल्लेखनीय मिश्रण दर्शवतो. या शोधातून सुरुवातीच्या सरपटणार्या प्राण्यांच्या उत्क्रांतीबद्दल नवीन आणि महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत.
या नवीन प्रजातीला ‘ब्रेग्नाथायर एल्गोलेन्सिस’ (Breugnathair elgolensis) असे नाव देण्यात आले आहे. स्कॉटलंडच्या गॅलिक भाषेत याचा अर्थ ‘एल्गोलचा खोटा साप’ असा होतो. या प्राण्याचे जबडे सापासारखे असून, त्याला अजगराप्रमाणे वक्र दात आहेत. हे वैशिष्ट्य त्याला लहान शिकार पकडण्यासाठी उपयुक्त ठरले असावे. परंतु, आधुनिक सापांप्रमाणे नसून, त्याचे शरीर मात्र सरड्यासारखे होते आणि त्याला पूर्ण विकसित पाय होते. याचा अर्थ, पारंपरिक सरडे आणि सापांच्या शरीर रचनेमध्ये असलेल्या संक्रमणात्मक शरीररचना दर्शवणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. ही प्रजाती स्क्वामाटा या गणात आणि पार्विराप्टोरिडे या उपगटात मोडते. हे जीवाश्म जुरासिक सरड्यांच्या आजवर सापडलेल्या नमुन्यांपैकी एक सर्वात संपूर्ण जीवाश्म आहे.
संशोधकांना साप कसे उत्क्रांत झाले, हे समजून घेण्यासाठी हा नमुना महत्त्वाचे पुरावे पुरवतो. ही प्रजाती किंवा तिच्यासारख्या प्रजाती सापांचे थेट पूर्वज आहेत की, शिकारीसाठी अशाच प्रकारचे अनुकूलन स्वतंत्रपणे विकसित झाले, हे निश्चित करणे शक्य नसले, तरी हा नमुना उत्क्रांतीच्या कथेतला एक महत्त्वाचा तुकडा आहे. हे जीवाश्म 2015 मध्ये गोळा करण्यात आले आणि त्यानंतर त्याचे आधुनिक इमेजिंग अभियांत्रिकी पद्धती वापरून विश्लेषण करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे संशोधकांना जीवाश्मावर कोणतीही प्रक्रिया न करता किंवा त्याला हात न लावता, त्यातील लहान शारीरिक भाग स्कॅन करून पाहणे शक्य झाले.
या शोधातून स्कॉटलंडमधील जुरासिक जीवाश्म स्थळांचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच, सरडे आणि साप यांसारखे सुप्रसिद्ध प्राणी गटदेखील अजूनही नवीन रहस्ये उलगडू शकतात, हे स्पष्ट होते. ‘बी. एल्गोलेन्सिस’ (B. elgolensis) सारखे शोध जुरासिक कालखंडातील उत्क्रांतीचा मार्ग (evolutionary trajectories) आणि जीवनाची विविधता समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील.