

लिमा : पेरूमध्ये सापडलेल्या एका प्राचीन चतुष्पाद व्हेलच्या जीवाश्मामुळे व्हेलच्या उत्क्रांतीवर नवीन प्रकाश पडू शकतो. पेरूच्या किनार्याजवळ पॅलेऑन्टोलॉजिस्टांना एका अज्ञात चार पायांच्या व्हेल प्रजातीचे अवशेष सापडले आहेत. हा शोध सुमारे 42.6 दशलक्ष वर्षांपूर्वी मायोसीन युगातील आहे. या शोधामुळे व्हेलच्या जमिनीवरील सस्तन प्राण्यांपासून ते आजच्या जलीय राक्षसांपर्यंतच्या उत्क्रांतीच्या प्रवासावर प्रकाश टाकतो.
करंट बायोलॉजीमधील अहवालानुसार, पेरेगोसेटस पॅसिफिकस नावाचे हे व्हेल प्रजाती प्लाया मीडिया ल्यूना जीवाश्म साईटवर सापडले. हा शोध व्हेलच्या स्थलांतर पद्धती आणि लवकर उत्क्रांती विकासाच्या द़ृष्टीने महत्त्वाचा आहे. पेरेगोसेटस पॅसिफिकस हे एक प्राचीन चतुष्पाद व्हेल आहे, म्हणजे त्याला चार पाय होते आणि ते जमिनीवर चालू शकत होते. हा शोध महत्त्वाचा आहे. कारण, दक्षिण अमेरिकेतील चतुष्पाद व्हेलचा हा पहिला विश्वसनीय रेकॉर्ड आहे. जीवाश्म चांगल्या स्थितीत आहे.
पॅलेऑन्टोलॉजिस्टांना त्याचे जबडे, पुढील आणि मागील पाय, पाठीचा कणा आणि शेपटीचा मोठा भाग सापडला आहे. पेरेगोसेटस पॅसिफिकसचा आकारदेखील लक्षणीय आहे. सुमारे 4 मीटर (13 फूट) लांबीचे हे व्हेल आधुनिक ऑटरपेक्षा मोठे होते, तरीही ऑटर आणि बीव्हरप्रमाणेच जमिनीवर हालचाल करण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये टिकवून ठेवतात. हे सूचित करते की, व्हेलचे उत्क्रांतीवादी पूर्वज जमिनीवर चालण्यास आणि पाण्यात पोहण्यास सक्षम होते, ज्यामुळे जमिनीवरील सस्तन प्राणी आणि आधुनिक व्हेल यांच्यातील अंतर भरून निघते.
पेरेगोसेटस पॅसिफिकसच्या शोधामुळे व्हेलच्या उत्क्रांतीवादी इतिहासाबद्दल आणि समुद्रातील जीवनाशी जुळवून घेण्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रॉयल बेल्जियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल सायन्सेसमधील पॅलेऑन्टोलॉजिस्ट आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक, ऑलिव्हियर लॅम्बर्ट यांच्या मते, पॅसिफिक महासागरातील चतुष्पाद व्हेलच्या सांगाड्याचा हा पहिला निर्विवाद रेकॉर्ड आहे आणि तो अमेरिकेतील सर्वात जुना असू शकतो.