

न्यूयॉर्क : केंटकीच्या मॅमथ गुहेतील खोल भागात जीवाश्म गोळा करणार्या संशोधकांना एक अतिशय लहान आणि अनोख्या खिळ्यासारख्या दातांच्या शार्कचे जीवाश्म सापडले आहे. या नव्या प्रजातीचे नाव क्लॅव्हसोडेन्स मॅकगिनिसी ठेवण्यात आले असून, तिला ‘मॅकगिनिसचा नेल टूथ‘ असेही संबोधले जात आहे. हा प्राणी सुमारे 340 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होता आणि ओब्रुचेवोडिड पेटालोडॉन्टस् या शार्क गटाचा भाग होता. या गटातील शार्कला त्यांच्या अगदी छोट्या आकारामुळे आणि अनोख्या दातांमुळे ‘चिपमंक शार्क’ असेही म्हणतात.
3 ते 4 इंच (7.5 ते 10 सेमी) लांब असलेले हे शार्क समुद्राच्या तळाशी राहणार्या खेकडे, अळ्या आणि इतर लहान जीवांवर उदरनिर्वाह करीत असत, असे नॅशनल पार्क सर्व्हिसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांचा लहान आकार त्यांना मोठ्या शिकारींपासून वाचवण्यास मदत करत होता. ‘जर्नल ऑफ पॅलिओन्टोलॉजी’मध्ये प्रकाशित अभ्यासात संशोधकांनी या नव्या प्रजातीचे अधिकृतपणे अनावरण केले. या शार्कला मॅकगिनिसचे नाव सेवानिवृत्त राष्ट्रीय उद्यान अधीक्षक डेव्हिड मॅकगिनिस यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. तसेच, त्याचे दात जुन्या लोखंडी खिळ्यांसारखे दिसत असल्यामुळे त्याला ‘नेल टूथ‘ असे संबोधले जाते. मॅमथ गुहा ही जीवाश्म संशोधनासाठी एक अनमोल खजिना आहे. या गुहेत आतापर्यंत 70 हून अधिक वेगवेगळ्या प्राचीन माशांच्या प्रजाती सापडल्या आहेत, असे ‘पार्क्स स्टूवर्डशिप फोरम’ या नियतकालिकातील 2024 च्या अभ्यासात नमूद केले आहे. या गुहेतील पाण्याच्या प्रवाहांनी कार्बोनिफेरस युगातील (358.9 ते 298.9 दशलक्ष वर्षांपूर्वी) सागरी गाळ जतन केलेला खडक तयार केला आहे. त्यामुळे संशोधकांना या खडकांच्या माध्यमातून त्या प्राचीन सागरी पर्यावरणाचा अभ्यास करण्याची अनोखी संधी मिळते, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.