

बर्लिन : जर्मनीमध्ये सापडलेल्या एका ‘अत्यंत विलक्षण’ जीवाश्माने जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुमारे 18.3 कोटी वर्षांपूर्वी जुरासिक काळात समुद्रात वावरणार्या या सागरी सरपटणार्या प्राण्याचे जीवाश्म सापडले असून, तो एका पूर्वी कधीही न पाहिलेल्या प्रजातीचा असल्याचे एका नवीन अभ्यासात स्पष्ट झाले आहे. या शोधामुळे जुरासिक काळातील सागरी जीवसृष्टीच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची भर पडली आहे.
या नव्या प्रजातीला ‘प्लेसिओनेक्टेस लाँगिकोलम’ (Plesionectes longicollum) असे नाव देण्यात आले आहे, ज्याचा अर्थ ‘लांब मानेचा, जवळ पोहणारा’ असा होतो. हा सागरी जीव ‘प्लेसिओसॉराईड’ (plesiosauroid) गटातील होता. या गटातील प्राणी लांब मानेचे, मांसाहारी आणि समुद्रात राहणारे होते. ज्या काळात जमिनीवर डायनासोरचे राज्य होते, त्या काळात हे जीव समुद्रावर अधिराज्य गाजवत होते.
सापडलेला जीवाश्म सुमारे 10 फूट (3 मीटर) लांब आहे, जो साधारणतः एका मगरीच्या आकाराएवढा आहे. विशेष म्हणजे, त्याच्या शरीराच्या एकूण लांबीपैकी निम्म्याहून थोडी कमी लांबी केवळ त्याच्या मानेची होती. हा जीव पूर्व जुरासिक काळातील ‘टोआर्शियन’ युगात म्हणजे सुमारे 18.3 कोटी ते 17.4 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. या प्राण्याचा जवळपास संपूर्ण सांगाडा 1978 साली जर्मनीतील एका खाणीत सापडला होता. ही खाण ‘पॉसिडोनिया शेल’ नावाच्या भूगर्भीय थराचा भाग आहे, जो उत्तमरीत्या जतन केलेल्या जीवाश्मांसाठी ओळखला जातो.