Jacob Coxon | एआय मानवालाच नष्ट करेल का?

‘ॲन्थ्रॉपिक’च्या संशोधकाच्या दाव्यामुळे चिंता
Jacob Coxon |
Jacob Coxon | एआय मानवालाच नष्ट करेल का?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची वाढती ताकद पाहता, आता त्याच्या धोक्यांबाबतची चिंताही वेगाने वाढू लागली आहे. प्रमुख ‘एआय’ संस्था ‘ॲन्थ्रॉपिक’मधून राजीनामा दिलेल्या जॅकब कॉक्सन या संशोधकाने दावा केला आहे की, ‘एआय’च्या निर्मितीतील वाढती स्पर्धा भविष्यात मानवाच्या अस्तित्वासाठीच गंभीर धोका ठरू शकते.

जॅकब कॉक्सन हे २७ वर्षांचे तरुण ‘एआय’ संशोधक आहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षांत ‘OpenAI’ आणि ‘Anthropic’ या दोन्ही आघाडीच्या कंपन्यांमध्ये ‘प्री-ट्रेनिंग रिसर्च’वर काम केले आहे. (प्री-ट्रेनिंग म्हणजे एआय मॉडेलला मोठ्या प्रमाणावर डेटा देऊन प्रशिक्षित करण्याची प्रक्रिया). ॲन्थ्रॉपिक सोडल्यानंतर कॉक्सन यांनी ‘X’ (ट्विटर) वर आपली चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, एआय कंपन्या अत्यंत वेगाने अशा ‘सुपरइंटेलिजन्स’च्या निर्मितीकडे वाटचाल करत आहेत, ज्या स्वतःला स्वतःहून अधिक प्रगत आणि विकसित करू शकतील.

कॉक्सन यांनी प्रश्न उपस्थित केला की, ‘जर एआय सिस्टीम मानवापेक्षा अधिक सक्षम झाली आणि स्वतःमध्येच सुधारणा करू लागली, तर मानव तिला नियंत्रित ठेवू शकेल का?’ त्यांच्या मते, भविष्यात अशा सिस्टीम तयार होऊ शकतात ज्या मानवापेक्षा अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील, कोणतीही डिजिटल प्रणाली हॅक करू शकतील, विविध क्षेत्रांत वेगाने बदल घडवून आणतील आणि प्रत्यक्ष संसाधनांपर्यंत पोहोचू शकतील. कॉक्सन यांनी असा गंभीर दावाही केला आहे की, एआय विकसित करणाऱ्या अनेक तज्ज्ञांना खरं तर भीती वाटतेय की, हे दशक संपण्यापूर्वीच एआय मानवजात नष्ट करू शकते.

ही केवळ कंपन्यांची मार्केटिंग किंवा प्रसिद्धीची स्टंटबाजी नसून, अनेक उच्च अधिकारी व वरिष्ठ संशोधक खासगी संभाषणांमध्ये ‘एआय’च्या धोक्यांबद्दल प्रचंड चिंता व्यक्त करतात. कॉक्सन यांच्या मते, ॲन्थ्रॉपिकमध्ये एआयशी संबंधित धोक्यांची पूर्ण जाणीव आहे, तरीही कंपनी इतर स्पर्धकांपासून पुढे राहण्याच्या शर्यतीत अडकली आहे. ॲन्थ्रॉपिकच्या आत असा विचार आहे की, जर त्यांनी स्वतःच्या संशोधनाचा वेग कमी केला, तर इतर कंपन्या पुढे निघून जातील आणि कदाचित त्या अधिक बेजबाबदारपणे एआय विकसित करतील. याच भीतीपोटी कंपनी या जीवघेण्या शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news